अमेरिकेत आता टेक्सास, कॅलिफोर्नियानंतर फ्लोरिडा प्रांतातही कोरोनाबाधितांची संख्या 10 लाखांहून अधिक झाली आहे. परंतु तेथे कठोर निर्बंध लागू करणार नसल्याचे गव्हर्नरांनी स्पष्ट केले आहे. अमेरिकेतील रुग्णालयांवरील दबाव आता मोठय़ा प्रमाणात वाढला आहे. देशाच्या रुग्णालयांमध्ये 1 लाखांहून अधिक कोरानाबाधित उपचार घेत असून यातील काहींची प्रकृती गंभीर आहे.
लस किंवा औषधांना मंजुरी देणाऱया फूड अँड ड्रग ऍडमिनिस्ट्रेशनच्या म्हणजेच एफडीएच्या आयुक्ताला मंगळवारी रात्री व्हाइट हाउसमध्ये पाचारण करण्यात आले होते. लसीला मंजुरी मिळण्यास विलंब का होतोय, अशी विचारणा त्यांच्याकडे झाली आहे. मंजुरी अर्जावर अत्यंत मेहनतीने आणि वेगाने काम केले जात आहे. कुणीच हातावर हात धरून बसलेला नाही. घाईगडबडीत आम्ही कुठलाच निर्णय घेऊ शकत नाही, असे उत्तर आयुक्त स्टीफन हान यांनी दिले आहे.