ट्रम्प यांची पत्रकार परिषद रद्द
वृत्तसंस्था /वॉशिंग्टन
अमेरिकेत मागील वर्षी सत्तांत्तर झाले, निवडणुकीत जो बायडेन विजयी तर डोनाल्ड ट्रम्प पराभूत झाले. संसदेच्या दोन्ही सभागृहांनी बायडेन यांच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. सर्वकाही स्पष्ट होते, परंतु ट्रम्प हार मानण्यास तयार नव्हते. निवडणुकीत गैरप्रकार झाल्याचा त्यांचा दावा होता. या पार्श्वभूमीवर 6 जानेवारी 2021 रोजी ट्रम्प समर्थकांनी एकप्रकारे देश आणि लोकशाहीच्या विरोधात हिंसक बंड करत संसदेवर हल्ला केला. या हिंसेत 5 लोक मारले गेले होते.
संसदेवरील हल्ल्याप्रकरणी भूमिका मांडण्यासाठी ट्रम्प हे बुधवारी पत्रकार परिषद घेणार होते, परंतु ती रद्द करण्यात आली आहे. याप्रकरणी स्थापन करण्यात आलेली चौकशी समिती पक्षपात करणारी आहे. समितीत डेमोक्रेट्ससह दोन अपयशी रिपब्लिकन्स आणि फेक न्यूज चालविणाऱया प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी असल्याचा आरोप ट्रम्प यांनी केला आहे.
6 जानेवारी 2021 रोजी झालेल्या हिंसेपूर्वी ट्रम्प यांनी स्वतःच्या हजारो समर्थकांना संबोधित करत निवडणुकीला फसवणूक ठरविले होते. त्यानंतरच त्यांच्या समर्थकांनी संसदेवर हल्ला चढविला होता. प्रतिनिधिगृहामध्ये पुढील वर्षी जानेवारीपर्यंत रिपब्लिकन पार्टीचे बहुमत होण्याची शक्यता आहे. असे झाल्यास संख्येच्या बळावर चौकशी करणाऱया समितीला विसर्जित करण्याचा निर्णय रिपब्लिकन पार्टीकडून घेतला जाऊ शकतो.