वॉशिंग्टन / वृत्तसंस्था
आफ्रिका खंडाच्या दक्षिण भागातील आठ देशांवरील प्रवास बंदी उठविण्याचा निर्णय अमेरिकेचे अध्यक्ष जोसेफ बायडन यांनी घेतला आहे. ही घोषणा व्हाईट हाऊसकडून करण्यात आली. अमेरिकेत ओमिक्रॉनचा प्रसार होऊ नये म्हणून गेल्या महिन्यात ही प्रवास बंदी लागू करण्यात आली होती.
दक्षिण आफ्रिका, बोत्सवाना, झिंबाब्वे, नामिबिया, लेसोथो, एस्वातिनी, मोझँबिक आणि मालावी अशी या देशांची नावे आहेत. या देशांवरील बंदी उठवावी अशी सूचना राष्ट्राध्यक्षांच्या सल्लागार मंडळाने केली होती. या बंदीमुळे संशोधकांना कोरोनाच्या नव्या रुपाचे संशोधन आणि अभ्यास करण्यास अवधी मिळाला. आता हा अभ्यास पूर्ण झाल्याने बंदी उठविण्यात आली आहे. सध्या ज्या लसी उपलब्ध आहेत, त्या ओमिक्रॉनशी लढण्यासही उपयुक्त आहेत, असे दिसून आले आहे. त्यामुळे आता बंदीची आवश्यकता नाही, असे स्पष्ट करण्यात आले.
ओमिक्रॉनचा प्रसार सुरुच
अमेरिकेत ओमिक्रॉनचा प्रसार सुरुच आहे. प्रतिदिन सरासरी 10 हजार नवे रुग्ण सापडत असले तरी लक्षणे मात्र फारशी तीव्र नाहीत. तसेच रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही समाधानकारक आहे. कोरोनाच्या या रुपाचा प्रसार झपाटय़ाने होत असला तरी मृत्यूदर कमी आहे. तसेच सध्या उपलब्ध औषधांचा उपयोग याविरोधात केला जाऊ शकतो, असेही दिसून आले आहे. परिणामी, चिंतेचे फारसे कारण नसले तरी दक्षता मात्र पुढचे सहा महिने घ्यावीच लागणार आहे, असे तज्ञांचे मत आहे.
युरोपातही प्रसार
युरोपमध्ये ब्रिटन या देशात ओमिक्रॉनचा प्रसार सर्वाधिक आहे. आतापर्यंत दोन लाखांहून अधिकांना याची लागण झाली आहे. त्यामुळे ब्रिटनच्या प्रशासनाने बूस्टर डोस देण्याचा निर्णय घेतला असून तो लागू करण्यात आला आहे.