वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
अमेरिकेने 4 वर्षांमध्ये पहिल्यांदाच स्वतःकडील अण्वस्त्रांची माहिती दिली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या कार्यकाळात ही माहिती जाहीर करणे टाळले जात होते. ज्यो बायडेन यांच्या कार्यकाळात अमेरिकेच्या विदेश विभागाने अण्वस्त्रांची संख्या जाहीर केली आहे. 30 सप्टेंबर 2020 पर्यंत अमेरिकेच्या सैन्याकडे 3,750 सक्रीय आणि निष्क्रिय अण्वस्त्रs होती असे सांगण्यात आले आहे.
हा आकडा 2019 च्या तुलनेत 55 तर 2017 च्या तुलनेत 77 अण्वस्त्रांनी कमी आहे. 1967 मध्ये रशियासोबत झालेल्या शीतयुद्धावेळी अमेरिकेकडे एकूण 31,255 अण्वस्त्रs होती.
डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेला इराणसोबतच्या आण्विक करारातून बाहेर काढले होते. तसेच रशियासोबतच्या इंटरमीडिएट-रेंज न्युक्लियर फोर्सेस (आयएनएफ) करारातून अमेरिका बाहेर पडला होता. याचबरोबर रशियासोबत झालेला आणखीन एक संवेदनशील न्यू स्टार्ट करार मानण्यास अमेरिकेने नकार दिला होता.
न्यू स्टार्ट या कराराद्वारे अमेरिका तसेच रशियाने अण्वस्त्रांची संख्या नियंत्रित करण्यास सहमती दर्शविली होती. हा करार संपुष्टात आल्यास दोन्ही देश पुन्हा अण्वस्त्रांची संख्या वाढविण्यासाठी प्रयत्न करू शकतात. अशाप्रकारच्या करारात चीन देखील सामील असावा अशी भूमिका ट्रम्प यांनी मांडली होती. चीनकडे अमेरिका आणि रशियाच्या तुलनेत अण्वस्त्रांची संख्या कमी असल्याचे मानले जाते.