डॅनियल पर्ल यांच्या मारेकऱयाची सुटका रोखली
वृत्तसंस्था /इस्लामाबाद
अमेरिकेच्या इशाऱयामुळे घाबरलेले पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पत्रकार डॅनियल पर्ल यांच्या मारेकऱयांच्या सुटकेला स्थगिती दिली आहे. यामुळे पाकिस्तानच्या सिंध प्रांताच्या सरकारने ब्रिटनमध्ये जन्मलेला अल-कायदा दहशतवादी अहमद उमर सईद शेख आणि त्याच्या तीन सहकाऱयांची मुक्तता न करण्याचा निर्णय घेतला आहे. पाकिस्तानी न्यायालयाच्या आदेशावर ट्रम्प प्रशासनाने कठोर प्रतिक्रिया देत इशारा दिला होता.
सिंध प्रांताच्या सरकारने पाकिस्तानी सर्वोच्च न्यायालयाच्या 28 सप्टेंबरच्या आदेशाचा दाखला देत या चारही जणांची मुक्तता न करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले आहे. सिंध उच्च न्यायालयाने सुरक्षा यंत्रणांना शेख आणि अन्य आरोपींना कुठल्याही प्रकारच्या कोठडीत न ठेवण्याचा आदेश गुरुवारी दिला होता. न्यायालयाने त्यांच्या कोठडीवरून सिंध सरकारच्या सर्व अधिसूचना अमान्य ठरविल्या होत्या. चारही आरोपींना ताब्यात ठेवणे अवैध असल्याचे उच्च न्यायालयाने म्हटले होते.
अमेरिकेची भूमिका
पत्रकार डॅनियल पर्ल यांच्या मारेकऱयांच्या मुक्ततेच्या वृत्तानंतर अमेरिकेच्या विदेश विभागाने दहशतवाद्यांच्या सुटकेच्या आदेशाने चिंता वाटत असल्याचे म्हटले होते. अमेरिका या प्रकरणी कुठल्याही घटनाक्रमावर नजर ठेवून राहणार आहे. साहसी पत्रकाराच्या स्वरुपात पर्ल यांच्या वारशाचा सन्मान करत त्यांच्या कुटुंबाला समर्थन सुरूच ठेवणार असल्याचे अमेरिकेकडून सांगण्यात आले होते.
पाकिस्तानबाबत कठोर
पर्ल यांना न्याय मिळवून देण्यासाठी अमेरिकेने पाकिस्तानवर सातत्याने दबाव आणला आहे. डॅनियल पर्ल यांचे पालक रुथ आणि जूडी पर्ल यांनी सिंध उच्च न्यायालयाच्या निर्णयाची निंदा केली होती. पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाकडून आमच्या मुलाला न्याय मिळेल तसेच प्रसारमाध्यमांचे स्वातंत्र्य पुन्हा बहाल होईल अशा विश्वास असल्याचे त्यांनी म्हटले होते.
पर्ल यांच्या हत्येचे कारण
वॉल स्ट्रीट जर्नलचे दक्षिण आशिया विभागप्रमुख पर्ल (38 वर्षे) यांचे 2002 साली अपहरण करण्यात आले होते आणि त्यांचे शीर धडावेगळे करण्यात आले होते. पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा आयएसआय आणि अल कायदा या दहशतवादी संघटनेच्या संगनमतासंबंधी त्यांनी महत्त्वाची माहिती एकत्रित केली होती. याबाबत खुलासा होऊ नये म्हणून आयएसआयने ही हत्या घडवून आणल्याचा संशय आहे.