जिल यांची प्रतिमा हिलरी, मिशेल यांच्यापेक्षा वेगळी
अमेरिकेच्या अध्यक्षांची पत्नी असूनही शिक्षिका म्हणून स्वतःची ओळख निर्माण करण्याची कामगिरी जिल बायडेन यांनी केली आहे. शाळांमध्ये मुलांच्या समस्या जाणून घेणे, सैनिकांच्या कुटुंबांशी चर्चा करणे आणि रुग्णालयांमध्ये लोकांचे दुःख हलकं करताना त्या दिसून येतात. त्यांची हीच प्रतिमा त्यांना अधिक पारंपरिक दर्शविते.
जिल यांनी अलिकडेच दक्षिण-पश्चिम प्रांतांमध्ये लसीकरणाची भीती दूर करण्यासाठी लोकांच्या भेटीगाठी घेतल्या आहेत. तत्पूर्वी त्यांनी झूम ऍपद्वारे वॉशिंग्टनच्या कम्युनिटी कॉलेजमध्ये इंग्रजीचा वर्ग घेतला. जिल यांनी व्हाइट हाउसबाहेर पेड जॉब सुरू ठेवून तसाही इतिहास रचला आहे. जिल या नॉर्दन व्हर्जिनिया युनिव्हर्सिटीत इंग्रजीच्या प्राध्यापिका आहेत. यापूर्वीच्या प्रथम महिला हिलरी क्लिंटन, मिशेल ओबामा किंवा मेलानिया ट्रम्प यांच्यासारखे काम करून त्या चर्चेत राहत नाहीत.
जिल प्रथम महिलेच्या शिष्टाचारांचे पालन करतात, पण बडेजाव दाखवत नाहीत. हिलरी यांच्याप्रमाणे आक्रमक पद्धती त्यांनी स्वीकारलेल्या नाहीत. तसेच त्या मेलानिया यांच्याप्रमाणे देखावाही करत नाहीत मिशेल यांच्यासारखे त्या गंभीर मुद्दय़ांवर चर्चा करत नाहीत. निवडणूक प्रचारादरम्यान देखील त्या प्रतिनिधींशी त्यांचे कुटुंब आणि वैयक्तिक मुद्दय़ांवर चर्चा करायच्या अशी माहिती फोर्डहेम विद्यापीठातील प्राध्यापिका मोनिका मॅक्डरमॉट यांनी दिली आहे. मी शिक्षिका आहे आणि शिक्षिका म्हणून राहणेच पसंत असल्याचे जिल सांगतात.