वॉशिंग्टन
अमेरिकेचे नियोजित अध्यक्ष जो बायडेन यांनी डेब हालँड यांची अंतर्गत व्यवहार मंत्री म्हणून निवड केल्याचे वृत्त आहे. असे घडल्यास अमेरिकेत पहिल्यांदाच मूलनिवासी जमातीच्या सदस्याला हा मान मिळणार आहे. अमेरिकेच्या विविध विभागांसोबत मूलनिवासी जमातींचा खटका उडत असल्याने ही नियुक्ती आहत्त्वाची ठरणार आहे. अंतर्गत व्यवहार विभागाची व्याप्ती अत्यंत मोठी असून यात 70 हजारांहून अधिक कर्मचारी कार्यरत आहेत. या विभागाच्या अंतर्गत देशातील नैसर्गिक साधनसंपत्ती, राष्ट्रीय उद्याने आणि आदिवासींचे क्षेत्र येते.
अमेरिकेत संघीय प्रशासनाकडून 578 मूलनिवासी जमातींना मान्यता देण्यात आली आहे.
आदिवासी समुदायाशी संबंधित सेवा सुधारण्यास 60 वर्षीय हालँड यांचा भर राहणार आहे. कोरोना महामारीदरम्यान अमेरिकेतील मूळनिवासी कुटुंबांना मोठा फटका बसल्याने त्यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.
बिडेन-हॅरिस यांचे हवामान बदल विषयक धोरण पुढे नेणे, ट्रम्प प्रशासनाने आदिवासींसोबतचे संबंध बिघडवून ठेवल्याने ते सुधारणे आणि अमेरिकेच्या प्रशासनात पहिली मूलनिवासी मंत्री होण्याचा मान मिळविणे माझ्यासाठी अभिमानास्पद ठरणार असल्याचे हालँड यांनी म्हटले आहे. बिडेन यांनी मायकल रिगन यांची पर्यावरण रक्षण मंत्री म्हणून निवड केल्याचे समजते. रिगन यांनी क्लिंटन तसेच बुश प्रशासनात हेच पद भूषविलेले आहे. बिडेन यांच्या हवामान विषयक महत्त्वाकांक्षी योजनांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी त्यांना दिली जाऊ शकते.