भारताशी संबंध अधिक दृढ करण्याचे संकेत, ट्रम्प अद्यापही नाराज
वॉशिंग्टन / वृत्तसंस्था
पेन्सिलव्हानिया या महत्वाच्या प्रांतात यश संपादन केल्यानंतर आता अमेरिकेचे भावी अध्यक्ष जोसेफ तथा ज्यो बायडन यांनी अमेरिकेची सूत्रे हाती घेण्याची सज्जता करण्यास प्रारंभ केला आहे. आपण संपूर्ण अमेरिकेचे अध्यक्ष असून निवडणूक काळात आलेली कटुता दूर करण्याचा आपला प्रयत्न असेल. सर्वांनी सहकार्य करावे, असे प्रतिपादन त्यांनी त्यांच्या विजयसंदेशात केले आहे.
आपल्या सहकारी उपाध्यक्षा कमला हॅरिस व आपल्या इतर निकटच्या धोरण विषयक सहकाऱयांसह त्यांनी आपल्या कामांची प्राथमिकता सूची तयार करण्यास प्ररंभ केल्याचे वृत्त आहे. भारताशी संबंध अधिक दृढ करण्याचे संकेतही त्यांनी दिले आहेत. आपल्या धोरणपत्रात त्यांनी याचा स्पष्ट उल्लेख केला आहे. भारताशी व्यापार, तंत्रज्ञान, गुंतवणूक, महामारी निवारण व आरोग्य, संरक्षण आणि पर्यावरण सुरक्षा आदी क्षेत्रांमध्ये सहकार्य व भागीदारी वाढविण्याचा त्यांचा मानस असून ते त्या दृष्टीने त्वरित पावले टाकण्यास प्रारंभ करतील अशी शक्यता आहे.
जे झाले ते विसरून आणि कडवटणा नाहीसा करून आपण एकमेकांचे ऐकू आणि एकमेकांना संधी देऊ अशी सामोपचाराची भाषा बायडन यांनी त्यांच्या विजय संदेशात केली आहे. ती अप्रत्यरित्या मावळते अध्यक्ष ट्रम्प यांनाच उद्देशून असल्याचा अर्थ लावला जात आहे. प्रतिसादावर पुढील बाबी अवलंबून आहेत.
मित्रदेशांकडून प्रतीक्षा
जागतिक पर्यावरण संघटनेतून बाहेर पडणे, जर्मनी व फ्रान्स आदी देशांवर टीका करणे आदी धोरणांमुळे ट्रम्प वादग्रस्त ठरले होते. आता बायडन ट्रम्प यांची ही धोरणे त्वरित नाकारून नवा प्रारंभ करतील, अशी अपेक्षा अमेरिकेच्या अनेक मित्रदेशांना आहे. बायडन आपली धोरणे केव्हा घोषित करतात याची त्यांना प्रतीक्षा आहे.
ट्रम्प अद्यापही नाराज
बायडन यांनी आपण विजयी झालो आहोत असे समजू नये. अद्याप ही निवडणूक संपलेली नाही, अशी विधाने मावळते अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली आहेत. मात्र त्यांचे जावई जॅरेड कुशनर यांनी त्यांना समजावण्याचा प्रयत्न चालविलेला आहे, असेही वृत्त आहे. या निवडणुकीचा परिणाम आपण उदार मनाने स्वीकारावा, अशी विनंती कुशनर यांनी त्यांना व्हाईट हाऊसमध्ये त्यांची भेट घेऊन केली असल्याचे सांगण्यात येते. ट्रंप यांची भूमिका अद्याप अस्पष्ट आहे.
पंतप्रधान मोदींकडून शुभेच्छा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे भावी अध्यक्ष जोसेफ बायडन यांना शुभेच्छा दिल्या आहेत. त्याचप्रमाणे उपाध्यक्षपदी निवड झालेल्या कमला हॅरिस यांनाही त्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. आपल्या कार्यकाळात भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंध सर्व क्षेत्रांमध्ये अधिक दृढ होतील, याची शाश्वती आहे, असे प्रतिपादन त्यांनी त्यांच्या शुभेच्छापत्रात केले आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनीही बायडन यांना पत्र पाठवून भारताच्या वतीने शुभेच्छा दिल्या आहेत.
सोनिया गांधींकडून शुभेच्छा
काँगेसच्या कार्यकारी अध्यक्षा सोनिया गांधी आणि माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी बायडन यांना पत्राद्वारे शुभेच्छा दिल्या. आपण अमेरिकेला एकत्रित कराल व दिशा द्याल, असे राहुल गांधींनी म्हटले आहे, तर आपल्या कार्यकाळात भारत आणि अमेरिका संबंध अधिक सशक्त होतील असे सोनिया गांधींनी म्हटले आहे.