युक्रेन संकटाच्या आड तैवानवर हल्ला करू शकतो चीन
वृत्तसंस्था / तैवान
जगाची नजर सध्या युक्रेन आणि रशियाच्या युद्धावर आहे. चीन या संधीचा लाभ घेत तैवानवर हल्ला करू शकतो. अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन यांना चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांच्या कटाचा अंदाज आला असावा. याचमुळे बिडेन यांनी मंगळवारी एक तातडीची बैठक घेतली आणि यानंतर त्वरित अमेरिकेचे संरक्षणतज्ञ आणि विदेश मंत्रालयाचे एक उच्चस्तरीय शिष्टमंडळ तैवानची राजधानी तैपैईसाठी रवाना झाले आहे. या शिष्टमंडळात अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेचे प्रमुख विलियम बर्न्स देखील सामील आहेत हे विशेष.
चीनचे सैन्य युक्रेनच्या स्थितीचा लाभ घेत तैवानमध्ये मोठी सैन्य मोहीम राबवू शकते अशी भीती व्यक्त होतेय. यासंबंधी पेंटागॉन आणि सीआयएने तैवानच्या सरकारला गुप्तपणे माहिती पुरविली होती. चीनच्या कटासंबंधी माहिती मिळताच बिडेन प्रशासनाने पेंटागॉनला हायअलर्टवर ठेवले आहे. तेथे अनेक तातडीच्या बैठका पार पडल्या आणि त्यानंतर मंगळवारी अध्यक्ष बिडेन यांना घडामोडींची माहिती देण्यात आली. बैठकीनंतर अमेरिकेचे शिष्टमंडळ तैपैईसाठी रवाना झाले.
तैवानमध्ये पाठविण्यात आलेल्या शिष्टमंडळाचे नेतृत्व माजी जॉइंट चीफ्स ऑफ स्टाफ माइक मुलेन करत आहेत आणि यात अनेक अधिकाऱयांचा समावेश आहे. जनरल मुलेन यांना तैवान आणि संबंधित क्षेत्राबद्दल चांगली माहिती आहे. चीन आतापर्यंत तैवानला गिळपृंत करू न शकण्यामागे मुलेन यांच्या व्यूहनीतिचा मोठा हात असल्याचे मानले जाते.
अमेरिकेची तयारी
अमेरिकेच्या युद्धनौका तैवान सामुद्रधुनी आणि दक्षिण चीन समुद्रात यापूर्वीच तैनात आहेत. मुलेन यांनी जॉर्ज बुश ज्युनियर आणि ओबामांसोबत काम केले आहे. मुलेन यांना चीनला प्रत्युत्तर देण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. या पथकात माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मेघन सुलिवान देखील सामील आहेत. चीनेन कुठल्याही क्षणी तैवानच्या विरोधात सैन्य कारवाई केल्यास तेथे असलेले अमेरिकेचे नौदल आणि वायुदल त्वरित ऍक्शन मोडमध्ये येणार असल्याचा निर्णय पेंटागॉनने घेतला आहे. चीनचे आव्हान मोडून काढण्याची पूर्ण तयारी केली आहे. तैवानशी निरंतर संपर्क ठेवला जातोय असे अमेरिकेच्या अधिकाऱयाने म्हटले आहे.