अमेरिकेने रशियावर गुरुवारी आणि शुक्रवारी आणखी आर्थिक निर्बंध लादण्याचा निर्णय घेतला आहे. रशियाच्या सर्वात मोठय़ा सामरिक नौका निर्मिती प्रकल्पावर आता बंधने घालण्यात आली असून रशियाच्या हिरे खोदकाम कंपन्यांवरही निर्बंध घालण्यात आले आहेत. रशिया हा जगातील दुसऱया क्रमांकाचा हिरे उत्पादक देश असून यांपैकी बव्हंशी हिऱयांना पैलू पाडण्याचे काम भारतात केले जाते.
रशियाची अर्थव्यवस्था खिळखिळी करण्याचे अमेरिकेचे धोरण आहे. अर्थव्यवस्था कमजोर झाल्यास रशियाला युद्ध अधिक काळ खेचणे किंवा युद्धाची व्याप्ती वाढविणे जमणार नाही अशी भूमिका या निर्णयामागे आहे. युक्रेनच्या भूमीवर आपले सैन्य न उतरविण्याचा निर्णय अमेरिकेने हे युद्ध सुरु होण्याच्या वेळेसच घेतलेला होता. शस्त्रांच्या मार्गाने नव्हे, तर आर्थिक मार्गाने रशियावर दडपण आणणे आणि त्याला युद्धापासून परावृत्त करण्याची अमेरिकेची चाल आहे.
रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या कन्यांच्या आर्थिक व्यवहारांवरही अमेरिकेने काही दिवसांपूर्वी निर्बंध घोषित केले आहेत. हा पुतीन यांच्यावर कौटुंबिक दबाव वाढविण्याचाही प्रयत्न असू शकतो. रशियाच्या नौका निर्मिती कंपन्या आणि हिरे उत्पादन करणाऱया खाणी यांना आता अमेरिकेच्या बँकांकडून आर्थिक सहाय्य मिळणे दुरापास्त होणार असून त्यामुळे त्यांचे कार्य थंडावण्याची शक्यता आहे. हा रशियाचे उत्पन्न घटविण्याचा प्रयत्न असल्याचे बोलले जाते.