संरक्षण सामग्री खरेदीविषयी महत्वाचे निर्णय शक्य
@ नवी दिल्ली / वृत्तसंस्था
अमेरिकेचे संरक्षणमंत्री लॉईड ऑस्टीन यांच्या भारत दौऱयाला प्रारंभ झाला आहे. चीनच्या आक्रमक विस्तारवादी आव्हानाच्या पार्श्वभूमीवर या दौऱयाला अतिशय महत्व देण्यात येत आहे. शुक्रवारी संध्याकाळी त्यांचे भारतात आगमन झाले. हा दोन दिवसांचा दौरा असून त्यात संरक्षण धोरण, क्वाड, चीन, भारत-अमेरिका संरक्षण भागीदारी आणि विविध विषयांवर चर्चा होणार आहे.
काही करारही या दौऱयात केले जातील अशी शक्यता आहे. भारत अमेरिकेचा मोठा संरक्षण खरेदीदार देश आहे. अमेरिकेने भारतात संरक्षण सामग्री तयार करणारी उत्पादन केंद्रे स्थापन करावीत अशी भारताची अपेक्षा आहे. त्यासंबंधी या दौऱयात चर्चा होणार की नाही, हा औत्सुक्याचा विषय मानला जात आहे.
धोरणात्मक भागीदारी सुदृढता
भारत आणि अमेरिका यांच्यातील धोरणात्मक भागीदारी अधिक सुदृढ करणे हा त्यांच्या दौऱयाचा प्रमुख हेतू आहे. त्याचप्रमाणे भारत-प्रशांतीय महासागर क्षेत्रात सहकार्य वाढविणे, या क्षेत्राची सुरक्षा सुनिश्चित करणे, पूर्व लडाखमध्ये चीनच्या आक्रमकपणाला वेसण घालणे, तसेच अफगाणिस्तानातील शांतता प्रक्रिया इत्यादी विविध विषयांवर ते भारताचे संरक्षणमंत्री राजनाथसिंग यांच्याशी बोलतील. पंतप्रधान मोदींनाही ते भेटतील आणि चर्चा करतील अशी शक्यता आहे.
पेडेटर डोनचा मुद्दा
भारत अमेरिकेकडून अत्याधुनिक पेडेटर ड्रोन्स विकत घेण्याची तयारी करीत आहेत. अशी 30 ड्रोन्स भारत 300 कोटी डॉलर्सना विकत घेणार आहे. यासंबंधी ऑस्टीन पंतप्रधान मोदींशी चर्चा करण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे रशियाबरोबर भारताचा एस 400 ही क्षेपणास्त्र यंत्रणा करार झाला आहे. तथापि, अमेरिकेचा त्याला विरोध आहे. या वादग्रस्त मुद्दय़ावरही बोलणी होणे शक्य आहे. तथापि, हा मुद्दा भारत आणि अमेरिका संबंधांच्या आड येणार नाही, असे सांगितले जाते.