वृत्तसंस्था / लॉस एंजिल्स
1960 साली रोममध्ये झालेल्या ऑलिंपिक स्पर्धेत पुरूषांच्या डेकॅथ्लॉन क्रीडाप्रकारात सुवर्णपदक मिळविणारे अमेरिकेचे 86 वर्षीय ऍथलीट रेफर जॉन्सन यांचे वृद्धापकालाने निधन झाल्याची माहिती त्यांच्या कुटुंबियानी दिली.
रेफर जॉन्सन यांचे निधन बुधवारी झाल्याची माहिती एलए 84 फौंडेशनच्या सदस्यांनी प्रसिद्ध केली. या फौंडेशनची स्थापना जॉन्सन यांनी केली होती. अमेरिकेच्या ऍथलेटिक्स क्षेत्रामध्ये जॉन्सन यांनी वेगळे स्थान निर्माण केले होते. आधुनिक ऑलिंपिक चळवळीचे जॉन्सन यांना जनक म्हणून ओळखले गेले. 1984 च्या उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धेची क्रीडाज्योत रेफर जॉन्सन आणि सीईओ पीटर युबेमॉथ यांच्या हस्ते प्रज्वलीत करण्यात आली होती. 1956 च्या मेलबोर्न ऑलिंपिक स्पर्धेत जॉन्सन यांनी डेकॅथ्लॉनमध्ये रौप्यपदक मिळविले होते. त्यानंतर चार वर्षांनी म्हणजे 1960 साली झालेल्या रोम ऑलिंपिक स्पर्धेत त्यांनी पुरूषांच्या डेकॅथ्लॉन क्रीडाप्रकारात सुवर्णपदक मिळविले होते.
अमेरिकेच्या क्रीडा क्षेत्रामध्ये भरीव योगदान दिल्याबद्दल रेफर जॉन्सन यांचा जेम्स सुलिव्हान पुरस्कार देवून गौरव करण्यात आला होता. अमेरिकेतील हौशी गटात सर्वोत्तम ऍथलीट म्हणून जॉन्सन यांना ओळखले गेले. जॉन्सन हे अष्टपैलू क्रीडापटू म्हणून द टाईम आणि क्रीडा मासिकामध्ये त्यांची छायाचित्रे प्रसिद्ध करण्यात आली होती. ऍथलेटिक्स क्षेत्रातून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी एल्वीस प्रिस्ले यांच्या चित्रपटात तसेच 1968 साली जेम्स बॉण्ड लायसेन्स टु किल या चित्रपटात भूमिका केली होती. जॉन एफ केनेडी यांचा अध्यक्षपदाच्या निवडणूक प्रचार मोहिमेत जॉन्सन यांचा सहभाग होता. आंतरराष्ट्रीय क्रीडा क्षेत्रामध्ये स्पेशल ऑलिंपिकचे ते संस्थापक होते. रेफर जॉन्सन यांना अमेरिकन ऍथलेटिक्स फेडरेशन तसेच लॉस एंजिल्सचे मेयर गार्सेटी आणि अन्य अनेक मान्यवर ऍथलीट्सनी श्रद्धांजली वाहिली.