जेनेट येलेन यांच्या नावाची बायडेन यांच्याकडून घोषणा
वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
अमेरिकेचे नियोजित अध्यक्ष ज्यो बायडेन यांनी अर्थमंत्री पदासाठी जेनेट येलेन यांची निवड केली आहे. अमेरिकेच्या सिनेटकडून येलेन यांच्या नियुक्तीला पुष्टी मिळाल्यावर 74 वर्षीय येलेन 231 वर्षांच्या अमेरिकेच्या इतिहासात अर्थमंत्रालयाचे नेतृत्व करणाऱया पहिल्या महिला ठरणार आहेत.
अमेरिकेत पहिल्यांदाच एक महिला अर्थमंत्री होणार आहे. 74 वर्षीय येलेन अमेरिकेतील मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्हच्या प्रमुख राहिल्या आहेत. येलेन यांना आर्थिक विषयांची चांगलीच जाण आहे. बायडेन यांच्या आर्थिक धोरणांना आकार आणि दिशा देण्यात त्या निर्णायक भूमिका बजावू शकतात, असे जाणकारांचे मानणे आहे. येलेन सध्या ब्रुकिंग्स इन्स्टिटय़ूट या संशोधन संस्थेत कार्यरत आहेत. 2014 ते 2018 पर्यंत त्या फेडरल रिझर्व्हच्या प्रमुख होत्या. तत्पूर्वी 1997 ते 1999 पर्यंत त्या व्हाईट हाऊसच्या आर्थिक सल्लागार परिषदेच्या प्रमुख होत्या.