ऑनलाईन टीम / बीजिंग :
चीनमधील अल्पसंख्याक समूहावरील अन्याय आणि सत्तेवर असलेल्या कम्युनिस्ट पक्षाच्या धोरणांवर टीका केल्याने चीनने अमेरिकेच्या चार खासदारांना प्रवेश बंदी केली आहे. चिनी परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता हुआ चुनयिंग यांनी याबाबतची माहिती दिली आहे.
मार्को रूबियो, टेड क्रूझ, सॅम ब्राऊनबॅक आणि ख्रिस स्मिथ अशी प्रवेशबंदी घालण्यात आलेल्या खासदारांची नावे आहेत. या खासदारांनी शिनजियांग प्रांतात उइगर मुस्लिमांवर होत असलेल्या अन्यायावरून चीनवर जोरदार टीका केली. याच मुद्यावरून चीनमधील कम्युनिस्ट पक्षालाही धारेवर धरण्यात आले होते. त्यामुळे संतापलेल्या चीनने या खासदारांना चीनमध्ये प्रवेशबंदी केली आहे.
चुनयिंग म्हणाले, राष्ट्रीय सार्वभौमत्वाबाबत चीन ठाम आहे. चीनच्या अंतर्गत बाबीत अमेरिकेच्या खासदारांनी ढवळाढवळ करण्याची गरज नव्हती. अल्पसंख्याक समूहावरील अन्याय आणि कम्युनिस्ट पक्षाच्या धोरणांवर टीका केल्याने या खासदार आणि अधिकार्यांच्या व्हिसावरही निर्बंध लादले आहेत.
दरम्यान, अमेरिकेनेही चिनी अधिकारी आणि कम्युनिस्ट पक्षाच्या सदस्यांवर निर्बंध लादले होते. त्यामुळे चीननेने अशाच प्रकारे कारवाई केल्याचे सांगण्यात येते.