वृत्तसंस्था/ युजीन
येथे सुरू असलेल्या अमेरिकन ऑलिंपिक फिल्ड आणि ट्रक निवड चाचणी स्पर्धेत अमेरिकेची महिला धावपटू सिडनी मॅक्लॉलिनने महिलांच्या 400 मी. अडथळय़ाच्या शर्यतीमध्ये नवा विश्वविक्रम नोंदविला. या स्पर्धेतील रविवारचा दिवस मॅक्लॉलिनसाठी ऐतिहासिक ठरला.
महिलांच्या 400 मी. अडथळय़ाच्या शर्यतीत मॅक्लॉलिनने 51.90 सेकंदाचा अवधी घेत नवा विश्वविक्रम नोंदविला. मॅक्लॉलिनने आपली नजीकची प्रतिस्पर्धी डेलिया मोहम्मदला 0.52 सेकंदाने मागे टाकत हा विश्वविक्रम केला. टोकियो ऑलिंपिकसाठी ही अमेरिकेची निवड चाचणी स्पर्धा सुरू आहे.
पुरूषांच्या 200 मी. धावण्याच्या शर्यतीत नोहा लिलेजने 19.74 सेकंदाचा अवधी घेत प्रथम स्थानासह टोकियो ऑलिंपिकचे तिकीट निश्चित केले आहे. अमेरिकेचा 22 वर्षीय ऍथलीट जे. हॅरीसनने पुरूषांच्या उंचउडी आणि लांब उडी या क्रीडाप्रकारात प्रथम स्थान मिळविले. आता जुलै महिन्यात होणाऱया टोकियो ऑलिंपिक स्पर्धेत हॅरीसन उंचउडी आणि लांब उडी अशा दोन्ही क्रीडाप्रकारामध्ये अमेरिकेचे प्रतिनिधीत्व करणार आहे. यापूर्वी म्हणजे 1912 साली जिम थॉर्पने असा पराक्रम केला होता.