रोव्हरने लाल ग्रहावरून रंगीत छायाचित्र पाठविले- दुसऱया ग्रहावर गेलेल्या हेलिकॉप्टरचा संदेश
वृत्तसंस्था/ सॅन फ्रान्सिस्को
अमेरिकेची अंतराळ संस्था नासाच्या पर्सिवरेन्स मार्स रोव्हरने मंगळ ग्रहावरून जगासाठी पहिले रंगीत छायाचित्र आणि स्वतःची सेल्फी पाठविली आहे. शुक्रवारी रात्री उशिरा नासाने समाजमाध्यमांद्वारे ही छायाचित्रे प्रसारित केली आहेत. याचबरोबर पहिल्यांदाच अन्य ग्रहावर गेलेल्या हेलिकॉप्टरने स्वतःचा पहिला अहवाल नासाला पाठविला आहे. लँडिंगनंतर तेथे सर्वकाही सुरळीत असल्याचे हेलिकॉप्टरने कळविले आहे. अहवालात मंगळ ग्रहावरील तापमानाची माहितीही देण्यात आली आहे. यात रात्रीचे तापमान उणे 90 अंश सेल्सिअस असल्याचे सांगण्यात आले आहे.
पर्सिवरेन्स रोव्हरने जजीरो नावाच्या एकूण 820 फूट खोल क्रेटरवर लँडिंग केले तसेच स्वतःची पहिली सेल्फी जगाला उपलब्ध केली आहे. पर्सिवरेन्स रोव्हरच्या समाजमाध्यम खात्यांवरून मंगळाचे छायाचित्र तसेच सेल्फी प्रसारित केली आहे. ‘हॅलो वर्ल्ड, माझ्या घरातील माझा पहिला लुक’ असे यात म्हटले आहे.
सर्वात अचूक लँडिंग
पर्सिवरेन्स मार्स रोव्हरला गुरुवारी मंगळावर जीवसृष्टीच्या शोधासाठी उतरविण्यात आले होते. रोव्हरने भारतीय प्रमाणवेळेनुसार गुरुवार आणि शुक्रवारदरम्यान रात्री सुमारे 2 वाजता मंगळाचा सर्वात धोकादायक पृष्ठभाग जजीरो क्रेटरवर लँडिंग केले. आतापर्यंतच्या इतिहासात रोव्हरचे मंगळावरील हे सर्वात अचूक लँडिंग असल्याचा दावा नासाने केला आहे. पर्सिवरेन्स रोव्हर लाल ग्रहावरून मातीचे नमुनेही आणणार आहे.
47 कोटी किमीचा प्रवास
6 चाकांचा रोबोट 7 महिन्यांत 47 कोटी किलोमीटरचे अंतर कापून वेगाने स्वतःच्या लक्ष्यानजीक पोहोचला होता. अखेरची 7 मिनिटे अत्यंत अवघड आणि धोकादायक राहिली. या वेळेत हा रोबोट केवळ 7 मिनिटांत 12 हजार मैल प्रतितासावरून 0 च्या वेगावर आला, त्यानंतरच त्याचे लँडिंग झाले.
पाण्याचा शोध
पर्सिवरेन्स मार्स रोव्हर आणि इंजिन्यूटी हेलिकॉप्टर मंगळ ग्रहावर कर्बवायूने प्राणवायू तयार करण्याचे काम करणार आहेत. जमिनीखालील जीवन संकेतांसह पाण्याचा शोध आणि त्याच्याशी संबंधित परीक्षण करणार आहे. याचे मार्स इन्व्हायरमेंटल डायनामिक्स ऍनालायजर (एमईडीए) मंगळ ग्रहावरील हवामानाचे अध्ययन करणार आहे.