किडनीशी संबंधित रुग्णांना मिळणार नवे जीवन
वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
एका अहवालानुसार दरवर्षी भारतात अवयवदाता न मिळाल्याने सुमारे 5 लाख लोकांचा मृत्यू ओढवतो. अखेरच्या क्षणापर्यंत रुग्ण अवयवदात्याची करत राहतो. केवळ भारतच नव्हे तर जगातील अनेक देशांमध्ये हीच स्थिती आहे. याचदमयान लाखो लोकांच्या चेहऱयावर हास्य उमटविणारे वृत्त समोर आले आहे. जगात पहिल्यांदाच डुकराच्या किडनीला मानवी शरीरात प्रत्यारोपित करण्यात आले आहे. ही कामगिरी अमेरिकेच्या न्यूयॉर्क शहरातील एनवायू लँगोन हेल्थ मेडिकल सेंटरच्या सर्जनांनी केली आहे. डुकराची किडनी मानवी शरीरातही यशस्वीपणे कार्य करत आहे. या यशस्वी प्रत्यारोपणामुळे आगामी काळात मानवी अवयवांची कमतरता दूर करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
अवयवांची कमतरता दूर करण्यासाठी डुकरांवर दीर्घ काळापासून संशोधन केले जात होते. डुकराच्या पेशींमध्ये असलेले एक शुगर मानवी शरीराला स्वीकारत नाही. याचमुळे पूर्वीचे सर्व प्रयत्न अयशस्वी ठरले होते. पण यावेळी डॉक्टरांनी स्पेशल मॉडिफाईड जीन असलेल्या डुकराचा वापर केला. यात डुकराच्या पेशींमधील संबंधित शुगर संपविणे आणि इम्यून सिस्टिमच्या आक्रमणापासून वाचण्यासाठी काही जेनेटिक बदल करण्यात आले होते. वैद्यकीय क्षेत्रात याला मोठे यश मानले जातेय. गंभीर स्वरुपात आजारी असलेल्या रुग्णांसाठी हे वरदान ठरू शकते.
बेन डेड रुग्णावर परीक्षण
बेन डेड असलेल्या रुग्णामध्ये ही किडनी प्रत्यारोपित करण्यात आल्याचा खुलासा सर्जनांनी केला आहे. संबंधित रुग्णाची किडनी जवळपास खराब झाली होती. रुग्णावरील लाईफ सपोर्ट सिस्टीम हटविण्यासाठी त्याच्या कुटुंबियांकडून रितसर अनुमती घेण्यात आली होती. डॉक्टरांच्या पथकाने डुकराच्या किडनीला दोन ते तीन दिवसांपर्यंत देखरेखीत रुग्णाच्या शरीराबाहेर एका मोठय़ा धमनीशी जोडले, जेणेकरून तिला रक्त आणि ऑक्सिजन मिळत राहिल.
मानवी किडनीप्रमाणेच कार्य
किडनीने कुठलेही रिजेक्शन न करता स्वतःचे कार्य केले आहे. प्रत्यारोपित किडनीच्या कार्याशी निगडित सर्व परीक्षणांचे निष्कर्ष अत्यंत चांगले वाटत आहेत. या किडनीने रुग्णाच्या शरीरात मूत्राचे तितकेच प्रमाण तयार केले, जितके मानवी किडनीपासून आम्ही अपेक्षा करतो. अशा स्थितीत आम्हाला शरीरापासून या किडनीचा अस्वीकार करण्याचे कुठलेच संकेत मिळाले नसल्याचे उद्गार प्रत्यारोपणाचे मुख्य सर्जन डॉ. रॉबर्ट मोंटगोमरी यांनी काढले आहेत.
क्रिएटिनिनची पातळी सामान्य
रुग्णाच्या शरीरात क्रिएटिनिनची पातळी पूर्वी असामान्य होती. सर्वसाधारणपणे एखाद्या रुग्णाची किडनी योग्यप्रकारे काम करत नसल्यास त्याच्या क्रिएटिनिनची पातळी कमी किंवा अधिक होते. पण आश्चर्याची बाब म्हणजे डुकराची किडनी प्रत्यारोपित केल्यावर रुग्णाच्या शरीरात क्रिएटिनिनची पातळी पुन्हा सामान्य झाल्याचे डॉ. मोंटगोमरी यांनी सांगितले आहे. या जेनेटिकली मॉडिफाय डुकराला युनायटेड थेरेप्यूटिक्स कॉर्पच्या रिविविकोर युनिटने विकसित केले होते.