गिन्सबर्ग यांच्या जागी एमी बॅरेट यांची निवड : ट्रम्प यांनी विरोध झुगारला
वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एमी कोने बॅरेट यांना अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून नियुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. एमी या दिवंगत न्यायाधीश रुथ बादेर गिन्सबर्ग यांची जागा घेणार आहेत. एमी यांच्या नियुक्तीला आता सिनेटची मंजुरी मिळवावी लागणार आहे. सिनेटमध्ये रिपब्लिकन पार्टीचे बहुमत असल्याने हे अवघड ठरणार नाही. तर डेमोक्रेटिक पार्टीचे अध्यक्षीय उमेदवार ज्यो बिडेन यांनी नव्या न्यायाधीशांच्या नियुक्तीला विरोध दर्शविला आहे.
एमी या उत्कृष्टपणे काम करतात, अशी प्रतिक्रिया ट्रम्प यांनी याप्रकरणी व्यक्त केली आहे. मागील काही महिन्यांपासून निवडणुकीच्या मैदानात पिछाडीवर राहिलेल्या ट्रम्प यांना एमी यांच्या नियुक्तीमुळे लाभ होऊ शकतो असे तज्ञ तसेच राजकीय विश्लेषकांचे मानणे आहे.
निवडणुकीच्या केवळ 39 दिवसांपूर्वी सरकारने एखाद्या नव्या न्यायाधीशाचे नाव अंतिम केल्याची इतिहासातील ही पहिलीच घटना आहे. सर्वसाधारणपणे निवडणुकीच्या वर्षात जुलैनंतर सर्वोच्च न्यायालयात कुठल्याही न्यायाधीशाची नियुक्ती केली जात नाही. परंतु ट्रम्प यांनी ही परंपराच संपुष्टात आणली आहे.
एमी यांची नियुक्ती गर्भपातसंबंधी कायद्यात बदल घडविण्याची मागणी करणाऱया आंदोलनाला प्रभावित करू शकते. अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयात 9 न्यायाधीश असतात. एखाद्या महत्त्वाच्या निर्णयावेळी त्यांच्यात 4-4 मते निर्माण झाल्यास सरकारकडून नियुक्त न्यायाधीशाचे मत निर्णायक ठरते. संबंधित न्यायाधीश अध्यक्षांकडून नियुक्त करण्यात आला असल्याने तो सरकारच्या बाजूनेच निर्णय देईल असेही मानले जाते.