नवी दिल्ली प्रतिनिधी
सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला भारतभेटीसाठी आलेल्या एका सीआयए अधिकाऱ्याला हवाना सिंड्रोम झाल्याची माहिती समोर आली आहे. हवाना सिंड्रोम भारतात आढळल्याचं हे पहिलंच प्रकरण आहे. लागण झालेले अमेरिकन अधिकारी सीआयएचे संचालक विल्यम बर्न्स यांच्या शिष्टमंडळाचा भाग होते. त्यांना भारतात मुक्कामी असताना वैद्यकीय मदत घ्यावी लागली, असे सीएनएन आणि एनवायटीवरील अहवालात म्हटले आहे. “हवाना सिंड्रोम” म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एका गूढ न्यूरोलॉजिकल आजारानंतर सुमारे चार वर्षांनी, क्युबा, चीन आणि इतर देशांमध्ये अमेरिकन मुत्सद्दी आणि गुप्तचर कार्यकर्त्यांना त्रास होऊ लागला आहे. या सिंड्रोमचा पहिला रुग्ण क्युबामधील हवानामध्ये आढळला होता. त्यामुळे या सिंड्रोमला हवाना नाव देण्यात आलंय.
राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी ८ सप्टेंबरला अमेरिकेचे गुप्तहेर सीआयए प्रमुख विल्यम बर्न्स यांची दिल्लीत भेट घेतली होती. तालिबानने अफगाणिस्तानमध्ये सत्ता चालवणाऱ्या लोकांची नावे जाहीर केल्यानंतर या दोघांमध्ये बैठक झाली होती. ज्या अमेरिकन अधिकाऱ्याला हवाना सिंड्रोमची लागण झाली आहे, ते अधिकारी देखील या बैठकीचा भाग होते आणि भारतात असताना त्यांना लक्षणे जाणवली अशी माहिती मिळत आहे.