वृत्तसंस्था/ चेन्नई
अंमलबजावणी संचालनालयाने मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी चेन्नईत एक हेलिकॉप्टर जप्त केले आहे. हे हेलिकॉप्टर अमेरिकेच्या शिफारसीनंतर ताब्यात घेण्यात आले आहे. अमेरिकेच्या अधिकाऱयांकडून करण्यात आलेल्या विनंतीनंतर भारताच्या तपास यंत्रणेने मोठी कारवाई करत चेन्नईमधून बीईएलएल 214 हेलिकॉप्टर जप्त केले आहे. हे हेलिकॉप्टर हामीद इब्राहिम आणि अब्दुल्ला यांच्या नावावर असून त्यांनी ते एएआर कॉर्पोरेशन कंपनीच्या माध्यमातून आयात केले होते.
बीईएलएल 214 हेलिकॉप्टर थायलंडमार्गे भारातात दाखल झाले होते. हे हेलिकॉप्टर चेन्नईच्या जे. मातादी मुक्त व्यापार गोदाम क्षेत्रात (एफटीडब्ल्यूझेड) ठेवण्यात आले होते. पीएमएलएचे कलम 17 (1अ) अंतर्गत क्षेत्राच्या संरक्षकाला एक आदेश जारी करण्यात आला आहे. या आदेशानुसार एफटीडब्ल्यूझेडमधून हेलिकॉप्टर आणि त्याच्या सुटय़ा भागांची वाहतूक रोखण्यात आली आहे. ईडीने ही कारवाई अमेरिकेच्या गृह सुरक्षा विभागाच्या विनंतीवर केली आहे. ईडीने यापूर्वी चेन्नई एफटीडब्ल्यूझेड आणि मैरीलॉग एव्हियन सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेडच्या संचालकांवर छापे टाकले होते.
या हेलिकॉप्टरचा अमेरिकेकडून निर्बंध लादण्यात आलेल्या देशांमध्ये जाण्यासाठी करण्यात आला होता. यासंबंधी गुन्हाही नोंदविण्यात आला आहे. आरोपींनी चेन्नईत हेलिकॉप्टर लपविले होते. याचमुळे भारताच्या यंत्रणेने अमेरिकेच्या सुचनेनुसार स्वतःच्या स्तरावर चौकशी करत हेलिकॉप्टर ताब्यात घेतले आहे.