अफगाणिस्तानात भाडोत्री हल्लेखोरांचा वापर
वृत्तसंस्था / काबूल
अफगाणिस्तानात तैनात अमेरिकेच्या सैनिकांवर धोका घोंगावू लागला आहे. तेथे चीन स्थानिक भाडोत्री हल्लेखोरांना पैसे देऊन या सैनिकांवर हल्ल्याचा कट रचत आहे. अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणांनी चीनच्या या कटासंबंधी ठोस पुरावे जमविले आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनाही यासंबंधी विस्तृत कल्पना देण्यात आली आहे.
अफगाणिस्तानात तालिबान आणि सरकार यांच्यात शांतता चर्चा सुरू आहे. परंतु चीन आणि पाकिस्तान मिळून तेथे तालिबानला चिथावणी देत आहेत. याचमुळे शस्त्रसंधीचे सर्व प्रयत्न आतापर्यंत अपयशी ठरले आहेत.
चीन आता अफगाणिस्तानात तैनात आमच्या सैनिकांवर भाडोत्री हल्लेखोरांकडून हल्ले करविण्याचा कट रचत असल्याचे आम्ही जाणतो. यासंबंधी अध्यक्षांना 17 डिसेंबर रोजी पूर्ण माहिती देण्यात आल्याचे अमेरिकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱयाने सांगितले आहे. अमेरिकेचे एनएसए रॉबर्ट ओ‘ब्रायन स्वतः हा अहवाल घेऊन ट्रम्प यांच्या कार्यालयात पोहोचले होते.