अमेरिकेने अफगाणिस्तानातील स्वतःचे सर्व सैनिक परत बोलाविले आहेत. अध्यक्ष जो बायडेन यांचा हा निर्णय वादग्रस्त ठरला आहे. जागतिक प्रसारमाध्यमांसोबत अमेरिकेतील प्रसारमाध्यमे देखील बायडेन यांनी घोडचूक केल्याचे म्हणत आहेत.
अमेरिकेतील सर्वाधिक लांबलेले युद्ध- न्यूयॉर्क टाईम्स
अमेरिकेच्या सर्वात लांबलेल्या युद्धाची अखेर जल्लोषाशिवाय झाली. काबूलमधील एकमात्र धावपट्टीवर आता भंगारच शिल्लक आहे. विमानतळाबाहेर अफगाण नागरिकांची गर्दी आहे, देशातून बाहेर पडता येईल अशी अपेक्षा त्यांना अद्याप वाटत असल्याचे न्यूयॉर्क टाईम्सने नमूद केले आहे.
बायडेन यांच्या वारशाचे युद्ध सुरू- सीएनएन
दीर्घकाळापासून चालत आलेल्या युद्धाला समाप्त केल्याचा दावा बायडेन करू शकतात, पण त्यांनी टीकाकारांसाठी मार्ग मोकळे केले आहेत. अफगाणिस्तानातील युद्ध संपले आहेत, पण बायडेन यांच्यासाठी ही वारशाच्या युद्धाची केवळ सुरुवात आहे. आता त्यांच्या नियंत्रणाबाहेर होत असलेल्या घटनांमुळे हा वारसा धोक्यात सापडू शकतो असे सीएनएनने म्हटले आहे.
20 वर्षांनी माघार ः वॉल स्ट्रीट जर्नल
अमेरिकेच्या सैन्याचे सी-17 विमान अखेरच्या अमेरिकन सैनिकांच्या तुकडीला घेऊन अफगाणिस्तानातून रवाना झाले. याचबरोबर अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात काळ चाललेल्या युद्धाच्या समाप्तीची घोषणा देखील झाली. पण तेथे अडकून पडलेले 200 अमेरिकन नागरिक आणि हजारो सहकाऱयांसमोर भविष्याची अनिश्चितता आणि सुरक्षेचा धोका उभा ठाकल्याचे वॉल स्ट्रीट जर्नलने नमूद पेले आहे.
स्वकीयांना समजाविण्यास अपयश ः एबीसी न्यूज
अध्यक्ष जो बायडेन स्वतःच्या कार्यकाळाच्या सर्वात वाईट टप्प्यातून जात आहेत. योग्य मार्गावर असल्याचे बायडेन हे स्वतःच्या पक्षाच्या सदस्यांनाच समजावू शकले नाहीत. अफगाणिस्तानातून सैन्याच्या माघारीचा निर्णय मोठी चूक ठरू शकते. सर्व अमेरिकन नागरिक परतेपर्यंत सैन्याने तेथेच रहावे असे 86 टक्के डेमोक्रेट्सचे मानणे आहे. तर रिपब्लिकन्समध्ये ही संख्या 87 टक्के असल्याचे एबीसी न्यूजकडून म्हटले गेले.
तालिबानच्या युगाची सुरुवात ः द गार्डियन
अखेरीस अफगाणिस्तानातून अमेरिकेचे सैन्य परतले. याचबरोबर अफगाणिस्तानात तालिबानच्या राजवटीत नव्या युगाची सुरुवात झाली. ब्रिटनचे माजी चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ लॉर्ड डेव्हिड रिचर्ड्स यांनी अफगाणिस्तानातील अमेरिका आणि ब्रिटनच्या निर्णयांवर टीका केली. अनेक जीव गेले, केवळ सैनिकच नव्हे तर कित्येक अफगाणींचा मृत्यू झाला. हजारो अफगाणी नागरिकांचा अपेक्षाभंग झाला आहे. मागील 6 महिन्यांमध्ये बायडेन यांच्या नेतृत्वाने अफगाण लोकांसोबत आम्हालाही निराश केल्याचे रिचर्ड्स म्हणाले.
लोकप्रियतेत घट ः रॉयटर्स
रॉयटर्स या वृत्तसंस्थेने एक सर्वेक्षण करविले आहे. यात केवळ 40 टक्के अमेरिकन नागरिकांनीच अफगाणिस्तानातून सैन्य परत बोलाविण्याचा बायडेन यांचा निर्णय योग्य ठरविला आहे. सर्व अमेरिकन नागरिक अफगाणिस्तानातून परतेपर्यंत सैन्य तेथेच ठेवणे योग्य होते असे तीन चतुर्थांश जणांचे मानणे आहे. 51 टक्के लोकांनी बायडेन यांच्या निर्णयाला चुकीचे ठरविले आहे.
पाकिस्तानात पोहोचले अमेरिकेचे सैनिक
अफगाणिस्तानातून परतलेले अमेरिकेचे शेकडो सैनिक पाकिस्तानात थांबल्याने चर्चेला उधाण आले आहे. या प्रकरणी टीकेचे धनी ठरलेल्या इम्रान खान यांच्या सरकारला स्पष्टीकरण द्यावे लागत आहे. अमेरिकेचे सैनिक मर्यादित कालावधीसाठी थांबल्याचा दावा गृहमंत्र्यांनी केला आहे.
अमेरिकेचे शेकडो सैनिक पाकिस्तानात पोहोचले आहेत. यामुळे पाकिस्तानात अमेरिका स्वतःचा सैन्यतळ निर्माण करणार असल्याची चर्चा रंगू लागली आहे. या चर्चेला पाकिस्तानचे गृहमंत्री शेख राशिद अहमद यांनी नाकारले आहे.
अफगाणिस्तानातून परतल्यावर अमेरिकेच्या सैनिकांना 21 ते 30 दिवसांचा ट्रान्झिट व्हिसा देण्यात आला आहे. मुशर्रफ यांच्याप्रमाणेच इम्रान खान सरकार निर्णय घेत असल्याची टीका आता होऊ लागली आहे. सैन्य हुकुमशहा परवेझ मुशर्रफ यांनी 2002 साली अमेरिकेला शम्सी आणि जकोबाबादमधील वायुतळ वापरण्याची अनुमती दिली होती.
इम्रान खान सरकार इस्लामाबादमधील हॉटेल्समध्ये अमेरिकेच्या सैनिकांच्या वास्तव्याची व्यवस्था करत असल्याचा विरोधकांचा आरोप अहमद यांनी फेटाळला आहे. अफगाणिस्तानातून 2,192 जण तोरखम सीमेवरून तर 1,627 जण विमानाद्वारे पाकिस्तानात पोहोचले आहेत. अत्यंत कमी संख्येत लोक चमन सीमेवरून दाखल झाले आहेत. अफगाणिस्तानच्या भूमीवरून तहरीक-ए-तालिबान पाकिस्तानला दहशतवादी कारवाया करू देणार नसल्याचे आश्वासन तालिबानने दिले असल्याचा दावा गृहमंत्र्यांनी केला आहे.