वॉशिंग्टन / वृत्तसंस्था
अमेरिकेच्या ‘निवडवृंदा’ने (इलेक्ट्रोरल कॉलेज) डेमॉपेटिक पक्षाचे नवनिर्वाचित नेते जोसेफ बायडन यांची अमेरिकेच्या अध्यक्षपदी निवड केली आहे. अमेरिकेतील अध्यक्ष निवड पद्धतीनुसार निवडवृंदाची अध्यक्ष निवडण्यासाठीची बैठक सोमवारी पार पडली. या बैठकीत अध्यक्षांची निवड करण्यात आली. निवडवृंदाच्या एकंदर 538 मतांपैकी बायडन यांना 306 तर मावळते अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांना 232 मते पडली. येत्या 20 जानेवारीला बायडन अध्यक्षपदाची शपथ घेणार आहेत.
3 नोव्हेंबरला झालेल्या अध्यक्षपदासाठीच्या निवडणुकीत बायडन विजयी झाले होते. मात्र ट्रंप यांनी हार मानण्यास नकार दिला होता. निवडणुकीत भ्रष्टाचार झाल्याने आपला पराभव झाल्याचे प्रतिपादन त्यांनी केले होते. तसेच काही प्रातांमधील निवडणूक परिणामांना न्यायालयात आव्हानही दिले होते. तथापि, न्यायालयांनी बायडन यांचा विजय वैध ठरविल्याने ट्रंप यांना व्हाईट हाऊस सोडावे लागणार हे निश्चित झाले आहे. आता निवडवृंदाकडूनही बायडन यांच्या विजयाला दुजोरा मिळाल्याने ट्रंप यांच्यासमोरचा शेवटाचा पर्यायही संपला आहे.
झाले गेले विसरून कामाला लागणार
निवडवृंदाकडून विजयाला दुजोरा मिळाल्याने बायडन यांनी आनंद व्यक्त केला. आता मागचे पान उलटण्याची वेळ आली आहे. निवडणूक प्रचाराच्या काळातील कटुता विसरून अमेरिकेला एकसंध करण्याच्या कामाला आपण लागणार आहोत, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. गेल्या काही दिवसात लोकेच्छेचा अवमान करण्यात आला, घटनात्मक मूल्ये नाकारण्यात आली आणि कायद्याचा अनादर करण्यात आला. जे घडावयास नको होते ते घडत होते. तथापि, आता मळभ दूर झाले असून नवा प्रारंभ होत आहे, असेही प्रतिपादन त्यांनी केले.
पुढे काय होणार ?
6 जानेवारी 2021 या दिवशी अमेरिकेच्या प्रतिनिधीगृहाची बैठक होणार आहे. त्यात निवडवृंदाच्या निर्णयाला प्रमाणित केले जाईल. याबरोबरच अध्यक्ष निवडीचा अंतिम टप्पा पूर्ण होईल. नंतर 20 जानेवारी 2021 या दिवशी जोसेफ बायडन अमेरिकेच्या अध्यक्षपदाची तर कमला हॅरिस उपाध्यक्षपदाची शपथ घेतील.