ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन :
अमेरिकेत नोव्हेंबरमध्ये होणारी राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक चीन, रशिया आणि इराण या तीन देशातील हॅकर्सच्या निशाण्यावर आहे, असा इशारा अमेरिकेतील टेक कंपनी मायक्रोसॉफ्टने दिला आहे.
मायक्रोसॉफ्टचे उपाध्यक्ष टॉम बर्ट म्हणाले, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार जो बायडेन यांचा निवडणूक प्रचार हॅकर्सच्या निशाण्यावर आहे. स्ट्रॉन्टियम हा रशियातील हॅकर्सचा गट आहे. हा गट रशियन सैन्याची गुप्तचर संस्था जीआरयूशी संबंधित असल्याचे सांगण्यात येते. 2016 मध्ये झालेल्या अमेरिकेच्या निवडणुकीत रशियन हॅकर्सने हस्तक्षेप केला होता.
चीन, रशिया आणि इराणच्या हॅकर्सकडून निवडणुकीशी संबंधित लोकांची हेरगिरी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. काही लोकांचे खासगी ई-मेल आणि ट्रम्प प्रशासनाशी निगडीत असलेल्या एका माजी प्रमुख अधिकाऱ्याच्या ई-मेल अकाउंटला लक्ष्य करण्यात आले आहे. तसेच 200 हून अधिक संघटनांना या हॅकर्सने लक्ष्य केले आहे. मात्र, या हॅकिंगचा निवडणुकीवर कोणताही परिणाम होणार नसल्याचे होमलँड सुरक्षा विभागाचे सायबर अधिकारी ख्रिस्टोफर क्रेब्स यांनी म्हटले आहे.