ज्येष्ठ नागरिकांना समजविण्याचे अमेरिकेच्या प्रशासनासमोर आव्हान : दुष्परिणाम अन् कमी प्रभावाची भीती अधिक
अमेरिकेत फायजरच्या कोरोना लसीचा वापर सुरू झाला आहे. लवकरच मॉडर्नाच्या लसीलाही नियामकीय मंजुरी मिळणार आहे. दोन्ही लसी 95 टक्क्यांपर्यंत प्रभावोत्पादक आणि सुरक्षित असल्याचा दावा करण्यात आला आहे. तरीही वृद्ध नागरिकांना लस टोचून घेण्यासाठी तयार करणे अमेरिकेच्या आरोग्य विभागासाठी आव्हानात्मक ठरत आहे.
लसीला मान्यता देणाऱया सल्लागार समितीच्या एका सदस्यानेही वृद्धांमध्ये याच्या वापराच्या विरोधात मतदान केले होते. लसीला आता आपत्कालीन वापराची अनुमती मिळाली आहे. वृद्धांमध्ये लस प्रभावी न ठरल्यास आणि अधिक दुष्परिणाम दिसून आल्यास लोकांमध्ये भीती पसरू शकते, असे समितीच्या सदस्य डॉक्टर हेलेन कीप टालबोट यांनी म्हटले आहे. परंतु समितीचे अन्य तज्ञ आतापर्यंतच्या पुराव्यांनुसार लस सुरक्षित असून वृद्धांसह कुणीही यासंबंधी घाबरू नये, असे सांगत आहेत.
सनोफी आणि ग्लॅक्सोस्मिथक्लाइन यांनी चाचणी निष्कर्ष अपेक्षेनुरुप राहिले नसल्याचे सांगत लस अधिक वयाच्या लोकांमध्ये अधिक प्रभावी ठरले नसल्याचे म्हटले होते. परंतु फायजर आणि मॉडर्ना या कंपन्यांनी स्वतःची लस वृद्धांमध्येही पूर्णपणे प्रभावी असल्याचा दावा केला आहे. अमेरिकेत 40 टक्के मृत्यू देखभाल केंद्रांमध्ये राहत असलेल्या लोकांचे झाले आहेत.
आपत्कालीन अनुमती
लसीला नियमित उपचाराच्या जागी आपत्कालीन वापराची अनुमती मिळाली असल्याने निम्मे अमेरिकने सांशक आहेत. व्हर्जिनिया कॉमनवेल्थ युनिवर्सिटीच्या एका सर्वेक्षणानुसार केवळ 46.9 टक्के लोकांनीच आपण लस घेऊ, असे नमूद केले आहे. तर लसीला नियमित अनुमती मिळाल्यास सुमारे 60 टक्के लोक याचा डोस घेण्यास तयार आहेत.