जन्मदर कमी झाल्याचा परिणाम
वृत्तसंस्था / वॉशिंग्टन
अमेरिकेतील श्वेतवर्णीयांची टक्केवारी पहिल्यांदाच घटल्याचे नव्या जनगणनेतून समोर आले आहे. मागील दशकाच्या (2011-2020) जनगणनेतील काही सांख्यिकी भाग सेन्सन ब्युरोने प्रसिद्ध केला आहे. अमेरिकेची समाजरचना अधिक वैविध्यपूर्ण झाली आहे. अमेरिकेच्या निवडणुकांमधील राजकीय समीकरणेही या जनगणनेनंतर बदलणार आहेत.
अमेरिकेत 2010 नंतर झालेले बदल या जनगणनेमध्ये नेंदविण्यात आले आहेत. यानुसार 2010 च्या जनगणनेतर 63.6 टक्के असणाऱया श्वेतवर्णीयांचे प्रमाण आता 57.8 टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे. हिस्पेनिक (मूळचे स्पेन किंवा पोर्तुगालचे) आणि आशियाई लोकांच्या तुलनेत श्वेतवर्णीयांचा जन्मदर कमी झाल्याने श्वेतवर्णीयांचे लोकसंख्येतील प्रमाण पहिल्यांदाच खालावले आहे. या जनगणनेनुसार अमेरिकेत सध्या 19.1 कोटी श्वेतवर्णीय आहेत.
कॅलिफोर्निया या अमेरिकेतील सर्वाधिक लोकसंख्येचा प्रांत असून तेथेही श्वेतवर्णीयांची संख्या कमी झाली आहे. 2010 च्या जनगणनेत कॅलिफोर्नियाच्या लोकसंख्येत 40.1 टक्के असणारे श्वेतवर्णीय नव्या जनगणनेत 34.7 टक्क्यांवर आले आहेत. दुसरीकडे तेथील हिस्पेनिक नागरिकांची टक्केवारी 37.6 टक्क्यांवरून 39.4 टक्क्यांवर पोहोचली आहे. यामुळे कॅलिफोर्नियाच्या लोकसंख्येत आतापर्यंत सर्वाधिक हिस्सेदारी बाळगणारे श्वेतवर्णीय आता दुसऱया क्रमांकावर गेले आहेत. हवाई, न्यू मेक्सिको आणि कोलंबिया येथेही हीच स्थिती निर्माण झाली आहे.
अमेरिका आता कधी नव्हे इतकी वैविध्यपूर्ण आणि बहुवर्णीय झाल्याची टिप्पणी सेन्सस ब्युरोचे अधिकारी निकोलस जोन्स यांनी केली आहे. अमेरिकेत श्वेतवर्णीय, कृष्णवर्णीय, अमेरिकन-भारतीय, हवाईचे मूळ नागरिक अथवा पॅसिफिक नागरिक असे प्रमुख वंशसमूह आहेत. पण याचबरोबर मिश्रवंशीय नागरिकांची संख्याही वाढल्याचे आढळून आले आहे. विशेष बाब म्हणजे या मिश्रवंशीयांची संख्या तेथील कृष्णवर्णीयांपेक्षा अधिक ठरली आहे.
अमेरिकेत 4.60 कोटी कृष्णवर्णीय असून मिश्रवंशीयांची संख्या 4.99 कोटीवर पोहोचली आहे. अमेरिकेतील आशियाई नागरिकांची संख्या वाढून 2.4 कोटी झाली आहे. ग्रामीण भाग आणि लहान शहरांमधील लोक महानगरांमध्ये स्थलांतरित झाले आहेत. युमळे महानगरांमध्ये लोकसंख्येची घनता वाढली आहे.