वृत्तसंस्था / वॉशिंग्टन :
कोरोना संकटाला तोंड देणाऱया जगासाठी एक चांगली बातमी आहे. अमेरिकेच्या एली लिली कंपनीने कोविड-19 मधून बरे झालेल्या एक रुग्णाच्या रक्ताच्या नमुन्यातून औषधाची निर्मिती केल्याची घोषणा केली आहे. या औषधाची आता माणसांवर चाचणी सुरू करण्यात आली आहे. कोरोना रुग्णाला अँटीबॉडीने तयार करण्यात आलेल्या जगातील पहिल्या औषधाचा डोस देण्यात आल्याचे कंपनीने म्हटले आहे.
या औषधाला ‘एलवाय-कोव555’ नाव देण्यात आले असून त्याची निर्मिती लिली आणि सेल्लेरा बायोलॉजी कंपनीने मिळून केली आहे. यापूर्वी मार्च महिन्यात लिली कंपनीने सेल्लेरासोबत अँटीबॉडीद्वारे कोरोना विषाणू नष्ट करण्यासाठी औषध तयार करण्यासाठी करार केला होता. पहिल्या टप्प्यातील अध्ययनात औषधाची सुरक्षितता आणि रुग्णालयात दाखल रुग्णांवरील त्याच्या परिणामांवर संशोधन केले जाणार असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले.
चाचणी यशस्वी ठरल्यास औषध लवकरच बाजारात उतरविले जाणार आहे. कंपनीने कोरोना संसर्गापासून मुक्ती मिळविलेल्या रुग्णाचा रक्तनमुना घेतल्याच्या केवळ 3 महिन्यांमध्ये हे औषध तयार केले आहे. एलवाय-कोव555 हे कोरोना विषाणु नष्ट करण्यासाठी तयार करण्यात आलेले पहिलेच औषध आहे. या औषधाद्वारे कोरोना विषाणूच्या स्पाइक प्रोटीनची संरचना निष्क्रीय केली जाऊ शकते.
पेशींपर्यंत पोहोचणार नाही विषाणू
एलवाय-कोव555 औषधामुळे कोरोना विषाणू शरीरातील कार्यरत पेशींपर्यंत पोहोचू शकणार नाही तसेच त्यांना नुकसान पोहोचवू शकणार नाही. अमेरिकेत कोरोना संसर्गातून बरे झालेल्या पहिल्या रुग्णाच्या रक्ताच्या नमुन्यातून अँटीबॉडी घेण्यात आली होती. रुग्णाला फुफ्फुसांशी संबंधित त्रास होता, त्याच आधारावर अँटीबॉडीने औषध तयार करण्यात आल्याचे कंपनीने म्हटले आहे. या औषधाच्या माध्यमातून बाधितांवर प्रभावी उपचार शक्य होतील अशी कंपनीला आशा आहे. औषधामुळे कोरोना विषाणूच्या स्पाइक प्रोटीन आणि त्याच्या पृष्ठभागावर अपेक्षित परिणाम होत असल्याचे अध्ययनात दिसून आले आहे.