बायडेन यांच्या विजयावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता
वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
अमेरिकेत 3 नोव्हेंबर रोजी अध्यक्षीय निवडणूक पार पडली असून यात ज्यो बायडेन विजयी झाले तर डोनाल्ड ट्रम्प पराभूत झाले आहेत. परंतु अमेरिकेतील अध्यक्षीय निवडणूक प्रक्रिया गुंतागुंतीची आहे. बायडेन यांना नियोजित अध्यक्ष संबोधिण्यात येत असले तरीही निकालाची अधिकृत घोषणा 6 जानेवारी रोजीच होणार आहे. यापूर्वी सर्वात महत्त्वाचा टप्पा इलेक्टोरज कॉलेज मतदान असणार आहे. हे मतदान 14 डिसेंबर रोजी पार पडणार आहे.
अमेरिकेत मतदार इलेक्टर्स निवडतात, तर इलेक्टर्सच्या समुहाला इलेक्टोरल कॉलेज म्हटले जाते. इलेक्टोरल कॉलेजमध्ये एकूण 538 इलेक्टर्स असतात. अध्यक्ष होण्यासाठी 270 इलेक्टोरल मते किंवा इलेक्टर्सचे समर्थन असणे आवश्यक आहे.
अमेरिकेच्या संसदेत हाउस ऑफ रिप्रेंझेटेटिव (एचओआर) आणि सिनेट अशी दोन सभागृहे आहेत. एचओआरमध्ये 435 तर सिनेटमध्ये 100 सदस्य असतात. एचओआर आणि सिनेटमध्ये एखाद्या प्रांताचे जितके सदस्य असतील तितकीच प्रांतातील इलेक्टर्सची संख्या असते. इलेक्टर्स निवडण्याचा निर्णय पक्षाचा अध्यक्षीय उमेदवार आणि पक्ष मिळून घेतात. राज्यघटनेनुसार इलेक्टर्स हे सिनेटर्स तसेच प्रतिनिधिगृहाचे सदस्यही नसतात.