ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन :
अमेरिकेने एच-1 बी आणि एल- 1 व्हिसावरील निर्बंध काही प्रमाणात शिथिल केले आहेत. त्यामुळे आयटी विभागात काम करणाऱ्या भारतीयांना दिलासा मिळाला आहे. निवडक प्रकरणात व्हिसाधारकांना अमेरिकेत येण्याची संधी मिळावी म्हणून या नियमात बदल करण्यात आले आहेत. ट्रम्प प्रशासनाने याबाबतची घोषणा केली आहे.
एच -1 बी व्हिसाधारकांना निर्बंध जाहीर होण्यापूर्वी ज्या कंपनीशी ते संबधित होते, त्याच कंपनीकडे नोकरी मिळविण्यासाठी परत जायचे असेल तर त्यांना प्रवास करण्याची परवानगी देण्यात येणार आहे. व्हिसावरील निर्बंध शिथिल करताना एच-1बी व्हिसाधारकाच्या पत्नी आणि लहान मुलांनाही अमेरिकेत परतण्याची परवानगी देण्यात आली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात निर्माण झालेल्या बेरोजगारीमुळे परदेशी नागरिकांना अमेरिकेत रोजगाराची संधी देणाऱ्या एच-1बी सह वेगवेगळ्या व्हिसांवर ट्रम्प यांनी बंदी आणली होती. आता हे निर्बंध काही प्रमाणात शिथिल करण्यात आले आहेत.