ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन :
अमेरिकेत कोरोनाबळींच्या संख्येने दीड लाखांचा टप्पा पार केला आहे. अमेरिकेत आतापर्यंत 44 लाख 33 हजार 410 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर 1 लाख 50 हजार 444 जणांचा मृत्यू झाला आहे. वर्ल्डोमीटर या संकेतस्थळाने ही आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.
सोमवारी अमेरिकेत 61 हजार 571 नवे कोरोना रुग्ण आढळले. तर 596 जणांचा मृत्यू झाला. दररोज सरासरी 60 हजारांहून अधिक कोरोना रुग्ण आढळत असल्याने तेथील परिस्थिती चिंताजनक आहे. 44.33 लाख कोरोना रूग्णांपैकी 21 लाख 36 हजार 603 रुग्ण या आजारातून बरे झाले असून, अजूनही 21 लाख 46 हजार 363 ॲक्टिव्ह केसेस आहेत. त्यामधील 19 हजार 100 रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे.
अमेरिकेतील कॅलिफोर्नियात कोरोनाचे संक्रमण सर्वात जास्त आहे. तिथे 4 लाख 66 हजार 506जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर 8544 जणांचा मृत्यू झाला आहे. तर न्यूयॉर्कमध्ये 4 लाख 40 हजार 435 जणांना बाधा झाली असून, 32 हजार 708 रुग्ण दगावले आहेत. याशिवाय न्यू जर्सी, टेक्सास, इलिनॉयस आणि फ्लोरिडातही कोरोना संक्रमण मोठ्या प्रमाणात झाले आहे.