ऑनलाईन टीम / न्यूयॉर्क :
अमेरिकेतील कोरोनाबाधितांची संख्या 10 लाखांहून अधिक झाली आहे. अमेरिकेसारख्या धनाढ्य देशही कोरोनाला रोखण्यात अपयशी ठरल्याचे तेथील कोरोनाबधितांच्या आणि मृतांच्या आकडेवारीवरून दिसते.
वर्ल्डओमीटर या संकेतस्थळांने दिलेल्या आकडेवारीनुसार, अमेरिकेत आतापर्यंत 10 लाख 35 हजार 765 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर 59 हजार 266 जणांचा मृत्यू झाला आहे. 1 लाख 42 हजार 238 रुग्ण या आजारातून बरे झाले असून, अजूनही अमेरिकेत 8 लाख 34 हजार 261 ॲक्टिव केसेस आहेत. त्यामधील 15 हजार 288 जणांची प्रकृती चिंताजनक आहे.
अमेरिकेत मागील 24 तासात 2470 जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. दिवसेंदिवस कोरोनाबळींची संख्या वाढत असल्याने अमेरिकेची चिंता वाढली आहे.
दरम्यान, मागील आठवड्यात अमेरिकेतील स्मिथफील्ड या मीट (मांस) फॅक्टरीतील 3700 कर्मचाऱ्यांपैकी 725 कर्मचारी कोरोनाबधित आढळले आहेत. या फॅक्टरीतून अमेरिकेत मोठ्या प्रमाणात मीटचा पुरवठा केला जातो. त्यामुळे साऊथ डकोटा राज्यात जवळपास 55% लोकांना कोरोनाची लागण झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.