वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
जगातील अनेक देशांमध्ये कोरोना संक्रमणामुळे होणाऱया मृत्यूंवर अद्याप नियंत्रण आलेले नाही. अमेरिका, रशिया आणि ब्राझीलमध्ये अद्याप महामारीमुळे मोठय़ा संख्येत लोकांचा मृत्यू होत आहे. अमेरिका अद्याप जगातील सर्वात प्रभावित देश आहे. जॉन हॉपकिन्स विद्यापीठानुसार जगभरातील बाधितांची संख्या 23.11 कोटींच्या पुढे गेला आहे. तर महामारीमुळे जीव गमाविणाऱयांचा आकडा 60.4 लाख झाला आहे.
अमेरिकेत प्रतिदिन सरारसी 2 हजार बळी जात आहेत. तर बहुतांश रुग्णांमध्ये कोरोनाचा डेल्टा व्हेरियंट आढळून येत आहे. अमेरिकेत शुक्रवारी बळींचा 7 दिवसांचा सरासरी आकडा 2,062 पर्यंत पोहोचला. तर दिवसभरात 1 लाख 23 हजार 74 नवे रुग्ण सापडले आहेत.
रशियातही मोठे संकट
रशियातही ब्राझीलसारखीच स्थिती आहे. रशियात दैनंदिन रुग्णांमध्ये घट होऊन देखील मोठय़ा संख्येत लोकांचा मृत्यू होत आहे. रशियात दिवसभरात 22 हजार नवे रुग्ण सापडले तर 822 जणांचा महामारीमुळे मृत्यू झाला आहे.
ब्राझील सावरेना
कोरोनाबळींप्रकरणी ब्राझील अद्याप जगातील दुसरा सर्वात प्रभावित देश आहे. ब्राझीलमध्ये दैनंदिन नव्या रुग्णांमध्ये घट होत असली तरीही अद्याप मोठय़ा संख्येत लोकांना जीव गमवावा लागत आहे. ब्राझीलमध्ये दिवसभरात 19,438 नवे रुग्ण सापडले तर 699 जणांचा बळी गेला आहे.