ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन :
अमेरिकेत कोरोना लसीची पहिली चाचणी यशस्वी ठरली आहे. ही लस टोचण्यात आलेल्या आठ जणांच्या शरीरात कोरोनाविरोधात लढण्यासाठी पुरेशी रोगप्रतिकारकशक्ती वाढली असून, समाधानकारक रिझल्ट समोर आल्याचे कोविड-19 वर लस तयार करणाऱ्या मोडर्ना थेराप्युटीक्स कंपनीने जाहीर केले आहे.
कोरोनाला रोखण्यासाठी अमेरिकेतील मोडर्ना थेराप्युटीक्स कंपनीने ही लस विकसित केली होती. मार्च महिन्यापासून या लसीच्या चाचण्या घेण्यात येत होत्या. पहिल्या आठ जणांना या लसीचे दोन डोस देण्यात आले होते. या आठ जणांच्या शरीरात तयार झालेल्या अँटीबॉडीजची प्रयोगशाळेत चाचणी केली असता ही लस सुरक्षित असल्याचे समोर आले. तसेच आठ जणांच्या शरीरात कोरोनाला रोखण्यासाठी पुरेशी रोगप्रतिकारकशक्ती वाढली आहे. त्यामुळे आता ही कंपनी दुसऱ्या 600 स्वयंसेवकांवर mRNA-1273 लसीची चाचणी करणार आहे. तर या लसीचा तिसरा टप्पा जुलै महिन्यात असेल, तेव्हा 1 हजार स्वयंसेवकांना लस टोचण्यात येईल.
अमेरिकन अन्न आणि औषध प्रशासनाकडून या कंपनीला आवश्यक परवानग्या मिळाल्या आहेत. जगात इतर 100 ठिकाणी कोरोना लसीवर संशोधन सुरू आहे.