अमेरिकेने सर्व नागरिकांच्या लसीकरणाच्या योजनेवरील काम गतिमान केले आहे. पुढील महिन्यापासून ही मोहीम सुरू होणार आहे. डिसेंबरच्या अखेरपर्यंत सुमारे 2 कोटी लोकांना लस दिली जाऊ शकते, अशी अपेक्षा वर्तविण्यात येत आहे. एप्रिलपर्यंत लसीचे 70 कोटी डोस तयार होणार आहेत. अमेरिकेतील सर्व नागरिकांना लस देण्याचे काम एप्रिल ते जुलैदरम्यान पूर्ण होणार आहे. मॉडर्ना आणि फायजरने तयार केलेल्या लसीचे दोन डोस प्रत्येक व्यक्तीला घ्यावे लागणार आहेत.
देशभरात लसीकरणासाठी अमेरिकेच्या प्रशासनाने ऑपरेशन वार्प स्पीड (ओडब्ल्यूएस) वर काम सुरू केले आहे. ही मोहीम आरोग्य विभाग, मनुष्यबळ विभाग आणि संरक्षण विभागासह काही खासगी कंपन्या तसेच अन्य संघीय यंत्रणांच्या मदतीने राबविण्यात येणार आहे. यांतर्गत कोरोना महामारीच्या विरोधात लसीचा विकास, निर्मिती आणि वितरणावर काम होत आहे.
मान्यता मिळताच वितरण सुरू
या लसीला चालू वर्षाच्या अखेरच्या महिन्यात आपत्कालीन वापराची अनुमती मिळण्याची पूर्ण अपेक्षा आहे. त्यानंतर त्वरित कोटय़वधी नागरिकांच्या लसीकरणाची मोहीम सुरू होणार असल्याची माहिती वार्पचे प्रमुख डॉ. मोनसेफ स्लाओई यांनी दिली आहे. एफडीएकडून मान्यता मिळाल्याच्या 24 तासांतच कोरोनावरील लसीचे वितरण सुरू करण्याची योजना संरक्षण विभाग आणि महामारी नियंत्रण तसेच प्रतिबंधक विभागाने आखली आहे.
100 कोटी डोस तयार होणार
फायजर, एस्ट्राजेनेका, जॉन्सन अँड जॉन्सन तसेच नोवावॅक्सकडून पुढील वर्षी 100 कोटी डोस तयार केले जाणार आहेत. मागील काही महिन्यांपासून वितरणाची तयारी सुरू आहे, लसीचे डोस मर्यादित असल्यास आरोग्य कर्मचारी, अधिक जोखीम असलेले नागरिक आणि 65 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या लोकांना प्राथमिकता देण्यात येणार असल्याचे आरोग्य विभागाचे सचिव एलेक्स अजार यांनी म्हटले आहे. मुलांसाठी लस कधीपासून उपलब्ध होईल हे अद्याप स्पष्ट नाही.