ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन :
चीनच्या ‘टिकटॉक’ या लोकप्रिय व्हिडिओ ॲपवरील बंदीला अमेरिकेच्या मध्यवर्ती न्यायालयाने पुन्हा स्थगिती दिली आहे.
टिकटॉक हे ॲप देशाच्या राष्ट्रीय एकात्मतेला आणि सार्वभौमत्वाला धक्का पोहचवणारे तसेच यूजर्सना असुरक्षित असल्याचे कारण देत भारत आणि अमेरिकेने त्यावर काही दिवसांपूर्वी बंदी घातली. अमेरिकेत 12 नोव्हेंबरपासून ही बंदी लागू होणार होती. मात्र, अमेरिकेत ट्रम्प यांच्या या निर्णयाविरोधात पेनसिल्व्हिनियातील विनोदवीर डग्लस मारलँड, टीकटॉकवर व्हिडिओ तयार करणारे दक्षिण कॅलिफोर्नियातील डिझायनर कॉसेट रिनाब आणि कनेक्टिकट येथील संगीतकार ॲलेक चेंबर यांनी याचिकेद्वारे आमच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा येत असून, उदरनिर्वाहाच्या साधनांवर परिणाम होत असल्याची तक्रार केली होती.
या याचिकेवर नुकतीच सुनावणी झाली. त्यावेळी अमेरिकेच्या जिल्हा न्यायाधीश वेंडी बिटलस्टोन यांनी अमेरिकेत टिकटॉकवरील बंदीच्या आदेशाला पुन्हा स्थगिती दिली.