नागरिकत्व संबंधी विधेयक संमत – 5 लाखांहून अधिक भारतीयांना लाभ
वृत्तसंस्था / वॉशिंग्टन
अमेरिकेच्या संसदेतील कनिष्ठ सभागृह ‘हाउस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह’ने एक महत्त्वाचे विधेयक ‘अमेरिकन ड्रीम अँड प्रॉमिस ऍक्ट’ संमत केले आहे. याचा लाभ अमेरिकेच्या नागरिकत्वाच्या प्रतिक्षेत असलेल्या 5 लाखांहून अधिक भारतीयांना मिळू शकतो. सभागृहाने हे विधेयक 228-197 मतांनी संमत केले आहे. हे विधेयक आता वरिष्ठ सभागृह म्हणजेच सिनेटमध्ये पाठविण्यात आले आहे. सिनेटची संमती मिळाल्यावर आणि अध्यक्ष जो बायडेन यांची स्वाक्षरी झाल्यावर याला कायद्याचे स्वरुप प्राप्त होणार आहे.
या विधेयकाला बायडेन यांनी यापूर्वीच समर्थन दिले आहे. त्यांनी सिनेटला हे विधेयक संमत करण्याचे आवाहन केले आहे. अमेरिकेत राहत असलेल्या कोटय़वधी ‘ड्रीमर्स’चे अमेरिकन नागरिक होण्याचे स्वप्न यातून सत्यात उतरणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. बायडेन यांच्या इमिग्रेशन अजेंडय़ाच्या दिशेने हे विधेयक पहिले पाऊल आहे.
डेमोक्रेटिक पार्टीच्या 5 खासदारांनी व्हिसावरील निर्बंध हटविण्याची मागणी केली आहे. यात एच-1बी व्हिसा देखील सामील असून हा भारतीय तंत्रज्ञांमध्ये अत्यंत लोकप्रिय आहे. निर्बंधांमुळे अमेरिकन नियुक्तदार, विदेशातून येणारे तंत्रज्ञ आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी अनिश्चितता निर्माण झाल्याचे खासदारांचे म्हणणे आहे.
ड्रीमर्स कोण
वैध दस्तऐवज नसलेल्या 1 कोटी 10 लाख स्थलांतरितांना अमेरिकन ड्रीम अँड प्रॉमिस ऍक्टच्या माध्यमातून अमेरिकेचे नागरिकत्व मिळू शकते. वैध दस्तऐवज नसलेल्या स्थलांतरितांना ड्रीमर्स म्हटले जाते. म्हणजेच असे स्थलांतरित जे आईवडिलांसोबत अमेरिकेत आले, पण दस्तऐवज नसल्याने त्यांना कायदेशीर देखरेखीत रहावे लागते. या स्थलांतरितांना त्यांच्या मायदेशी पाठविण्याचा मुद्दा वारंवार उपस्थित होत असतो. यात 5 लाखांहून अधिक भारतीयांचा समावेश आहे.