ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन :
अमेरिकेत एका 32 वर्षीय भारतीय सॉफ्टवेयर इंजिनिअरची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. मैत्रिणीशी असलेली जवळीक खटकल्याने आरोपीने मिसौरीतील सेंट लुईसमधील युनिव्हर्सिटी सिटी अपार्टमेंटमध्ये बुधवारी ही हत्या केली.
शरीफ रहमान असे हत्या झालेल्या या सॉफ्टवेयर इंजिनिअरचे नाव असून, तो मूळचा भोपाळचा रहिवाशी आहे. शरीफच्या एका मैत्रिणीसोबत संबंधित आरोपीचे एकतर्फी प्रेम होते. शरीफची तिच्यासोबत असलेली मैत्री आरोपीला खटकत होती. त्यामुळे त्याने शरीफचा काटा काढण्याचे ठरविले. बुधवारी यूनिवर्सिटी सिटी अपार्टमेंटमध्ये शरीफवर आरोपीने गोळीबार केला. या घटनेत जखमी झालेल्या शरीफला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
या प्रकरणाचा तपास करुन पोलिसांनी 23 वर्षीय कोल मिलर या आरोपीला अटक केली आहे. चार दिवसांपूर्वी शरीफला एका तरुणाने गोळी मारल्याचं वृत्त कुटुंबाला मिळालं होतं. मात्र, काल त्याच्या निधनाची दुःखद बातमी समजली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शरीफ रहमान खानवर अमेरिकेतच अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.