रेमडेसिविर औषध अमेरिकेत 1.75 लाख रुपयांमध्ये उपलब्ध : भारतात जेनेरिक औषधाचा होतोय पुरवठा
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
कोरोना संसर्गाच्या उपचारात वापरल्या जाणाऱया रेमडेसिविर औषधाची मागणी प्रचंड वाढली आहे. या औषधाचा आता काळाबाजार होऊ लागला आहे. एका वॉयलसाठी रुग्णांना 30 हजार ते 40 हजार रुपये खर्च करावे लागत आहेत. तर लोकांना औषध स्वस्तात मिळावे याकरता रेमडेसिविरची जेनेरिक आवृत्ती तयार करून ती विकली जात आहे. अमेरिकेत याच औषधाचा एक डोस सुमारे 29 हजार रुपयांना पडत आहे. तर भारतात याची किंमत 5,500 रुपयांपेक्षा अधिक नाही. एका रुग्णाला 5 दिवसांपर्यंत औषध दिले जाते. सद्यकाळात या औषधाची जेनेरिक आवृत्ती भारताच्या दोन कंपन्यांकडून तयार केली जात आहे. तर तिसऱया औषधाचे उत्पादन सुरू झाले आहे.
गिलिड या बहुराष्ट्रीय औषध कंपनीने भारतात डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीज लिमिटेड, जुबिलंट लाइफ सायन्सेस लिमिटेड, सिनजीन इंटरनॅशनल लिमिटेड आणि झायडस कॅडिलासोबत रेमडेसिविर निर्मिती आणि विक्रीचा करार केला आहे. भारतात आतापर्यंत हेटेरो लॅब्ज, सिप्ला लिमिटेड आणि मायलॅनने रेमडेसिविरची जेनेरिक आवृत्ती सादर केली आहे. या सर्व कंपन्यांना ड्रग कंट्रोलर ऑफ इंडियाकडून रेमडेसिविर निर्मिती आणि विक्रीची मंजुरी यापूर्वीच मिळाली आहे.
जेनेरिक अन् ब्रँडेड औषध
कित्येक वर्षांच्या संशोधनानंतर औषध निर्माण करणाऱया कंपनीकडे त्याचे पेटंट असते. पेटंटद्वारे एका निर्धारित काळापर्यंत अन्य कंपनीला संबंधित औषधाची निर्मिती करता येत नाही. संशोधन आणि विकासाचा खर्च वसूल करण्यासाठी कंपन्यांकडून किंमत वाढविली जाते. परंतु पेटंट समाप्त झाल्यावर उर्वरित औषध कंपन्या देखील संबंधित औषधाची जेनेरिक आवृत्ती निर्माण करू शकतात. जेनेरिक औषध निर्मितीसाठी प्रदीर्घ क्लीनिकल ट्रायल्सला तोंड द्यावे लागत नसल्याने त्यांचा खर्च कमी असतो आणि याच कारणामुळे किंमतही कमी राहते.
स्वस्त दरात उपलब्ध
अमेरिकेच्या फूड अँड ड्रग ऍडमिनिस्ट्रेशननुसार जेनेरिक औषधे स्वतःच्या ब्रँडेड आवृत्तीपेक्षा 80 ते 85 टक्क्यांनी स्वस्त असतात. भारतात नॅशनल लिस्ट ऑफ इसेंशियल मेडिसीन्स (एनएलईएम) अंतर्गत औषधांच्या किमती निर्धारित करण्यात येतात. या किमती सर्व ब्रँडेड आणि जेनेरिक औषधांवर लागू होतात.
श्रीमंत देशांसाठी औषध महाग
रेमडेसिविर हे औषध अमेरिकेच्या गिलिड सायन्सेस या कंपनीने विकसित केले आहे. श्रीमंत देशांसाठी औषधाची किंमत 2,340 डॉलर्स (सुमारे 1.75 लाख रुपये) प्रतिरुग्ण ठेवण्यात आली आहे. विकसनशील आणि गरीब देशांना औषध स्वस्त दरात मिळावे याकरता कंपनीने 127 अल्प आणि मध्यम उत्पन्नगटाच्या देशांमध्ये औषधाचा परवाना वितरित केला आहे. पुढील तीन महिन्यापर्यंत गिलिड कंपनी स्वतःचा सर्व पुरवठा अमेरिकेला करणार आहे. उर्वरित देशांमध्ये या औषधाची जेनेरिक आवृत्ती तयार केली जात असून ती तुलनात्मकदृष्टय़ा अत्यंत स्वस्त आहे.