ट्रम्प समर्थकांकडून बंडाची भीती : 4315 अणुबॉम्बचे थेट नियंत्रण
वॉशिंग्टन/ वृत्तसंस्था
अमेरिकेचे संसद भवन म्हणजेच कॅपिटॉल हिलवर अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थकांनी हिंसाचार घडवून आणल्यावर देशात सत्तापालटाचा धोका घोंगावू लागला होता. या हिंसाचारानंतर देशातील संकट पाहता अमेरिकेचे वायुदल सक्रीय झाले असून जगात महाविनाश घडवून आणणारे विमान ई-4बी’ नाइटवॉचने तत्काळ आकाशात गस्त घातली आहे. हे अत्याधुनिक विमान अमेरिकेच्या 4315 अणुबॉम्बना नियंत्रित करण्यास सक्षम आहे.
अमेरिकेच्या मेरिलँड येथील ऍन्ड्रय़ू वायुतळावरून नॅशनल एअर कमांड पोस्ट विमान ई-4बीने उड्डाण केले आहे. अमेरिकेत आलेल्या संकटाचा शत्रूदेशाने लाभ उचलू नये करता न्यूक्लियर डूम्सडे विमान ई-4बी तत्काळ ऍक्शनमध्ये आले आहे. या संकटानंतरही आण्विक हल्ला करण्यास सक्षम असून शत्रूंनी आगळीक केल्यास त्याला चोख प्रत्युत्तर देण्याचा संदेश अमेरिकेच्या सैन्याने याद्वारे दिला आहे.
या घातक विमानाला ‘नाइटवॉच’ म्हटले जाते. कुठल्याही प्रकारचा हल्ला झेलण्यास सक्षम असणारे हे विमान आहे. ई-4बी नाइटवॉच विमानात खिडक्या नसतात, आण्विक हल्ला झाल्यास त्यात बसलेल्या लोकांवर कुठलाच प्रभाव पडत नाही.
4 पैकी एक नेहमीच अलर्ट
ई-4बी ‘नाइटवॉच’ विमान सर्वप्रथम 1974 मध्ये सेवेत दाखल झाले होते. सुमारे 50 वर्षांच्या सेवेनंतर आता हे विमान निवृत्त होण्याच्या मार्गावर आहे. याचमुळे अमेरिकेचे वायुदल यात बदल करणार आहे. याच्या 4 विमानांपैकी एक नेहमीच अलर्ट मोडवर असते, जेणेकरून मोठे संकट आल्यास तत्काळ महाविनाश घडवून आणणारे हे विमान युद्धासाठी सज्ज व्हावे. याचमुळे या विमानाला डूम्सडे प्लेन म्हटले जाते.