वॉशिंग्टन / वृत्तसंस्था
कोरोना संसर्गाचा सर्वाधिक फटका बसलेल्या अमेरिकेतील स्थिती आता हळूहळू सावरत चालली आहे. संसर्ग नियंत्रणात आल्यामुळे आता लस मिळालेल्या नागरिकांनी मास्क वापरण्याची गरज नाही, अशी घोषणा अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी केली आहे. तसेच ‘सीडीसी’ने जाहीर केलेल्या नियमावलीची माहिती त्यांनी दिली. सीडीसीने कोरोना लस घेतलेल्या लोकांनी मास्क घालण्याची किंवा सोशल डिस्टन्सिंग पाळण्याची गरज नसल्याचे जाहीर केले. मात्र लस न घेतलेल्या नागरिकांना मास्क वापरणे बंधनकारक असल्याचे निर्देश सीडीसीने दिले आहेत. सीडीसीच्या या घोषणेनंतर अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन आणि उपाध्यक्षा कमला हॅरिस यांनी व्हाईट हाऊसमध्ये पत्रकारांशी संवाद साधला. अमेरिकेतील नागरिकांनी मोठय़ा प्रमाणात लस घेतल्याने आपली कोरोनामुक्तीकडे वाटचाल सुरू असल्याचे बायडेन यांनी स्पष्ट केले. एका वर्षाची कठोर मेहनत आणि अनेकांचा प्राण गमावल्यानंतर आपण ‘मास्क फ्री’च्या दिशेने वाटचाल करत असल्याचेही ते पुढे म्हणाले.