विस्कोंसिन दुहेरी हत्या प्रकरण – ट्रम्प यांच्याकडून न्यायालयाच्या निर्णयाचे समर्थन
वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
अमेरिकेच्या एका न्यायालयाने दोन जणांची हत्या करणे आणि एका व्यक्तीला गंभीर जखमी जखमी करण्याप्रकरणी आरोपी असलेल्या काइल रिट्टनहाउसला दोषमुक्त करण्याचे आदेश दिले आहेत. 18 वर्षीय काइलने मागील वर्षी विस्कोंसिनमध्ये ब्लॅक लाइव्स मॅटरच्या समर्थनार्थ सुरू असलेल्या निदर्शनादरम्यान गोळीबार केला होता.
न्यायालयाने निर्णय दिल्यावर अमेरिकेत गन संस्कृती, वंशद्वेष आणि कथित स्वरक्षणाच्या अधिकाराच्या मर्यादांवरून चर्चा पेटली आहे अमेरिकेच्या अनेक प्रांतांमध्ये लोक या निर्णयाच्या विरोधात रस्त्यांवर उतरले आहेत. अध्यक्ष जो बायडेन यांनी निर्णयाला विरोध करणाऱया लोकांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. तर माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी निर्णयाचे समर्थन करत काइलला शुभेच्छा दिल्या आहेत.
शिकागोमध्ये लूट अन् जाळपोळ
काइलला निर्दोष ठरविण्यात आल्यावर अमेरिकेत रिपब्लिकन आणि डेमोक्रेट समर्थक परस्परांसमोर उभे ठाकले आहेत. न्यूयॉर्कसह अनेक शहरांमध्ये न्यायालयाच्या निर्णयाच्या विरोधात निदर्शने होत आहेत. शिकागोच्या अनेक दुकानांमध्ये लूट आणि जाळपोळीच्या घटना घडल्या आहेत. पोर्टलँडमध्ये दंगली भडकल्या आहेत. मोठय़ा संख्येत पोलिसांना कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी तैनात करण्यात आले आहे.
निर्णयाला विरोध
निर्णयाला विरोध करणाऱयांनी त्याला श्वेतसमर्थक ठरविले आहे. रिपब्लिकन पार्टीचे सिनेटर टॉम कॉटन यांनी अध्यक्ष बायडेन यांनी जाहीर माफी मागावी अशी मागणी केली आहे. बायडेन यांनी काइलला वंशद्वेषी मारेकरी ठरविले होते असा कॉटन यांनी आरोप केला आहे. तर न्यूयॉर्कमध्ये झालेल्या एका सभेदरम्यान वक्त्यांनी हा निर्णय अमेरिकेच्या चेहऱयावर लाखोवेळा थप्पड लगावण्यासमान असल्याचे म्हटले. अमेरिकेत आजही जर कुणी बिगर श्वेतवर्णीयांचे समर्थन करत असल्यास त्याला व्यवस्थेच्या विरोधात मानले जात असल्याचा दावा त्यांनी केला.
ब्लॅक लाइव्स मॅटर
अमेरिकेत शुक्रवारी देण्यात आलेल्या या निर्णयानंतर बिगर श्वेतवर्णीयांच्या समर्थनार्थ ब्लॅक लाइव्स मॅटरचा मुद्दा पुन्हा तापला आहे. यावेळीही ब्लॅक लाइव्स मॅटरला सर्व समुदायांकडून समर्थन मिळत आहे. निदर्शनांमध्ये मोठय़ा संख्येत श्वेतवर्णीय देखील भाग घेत आहेत.