सुटकेससारख्या बॉक्सची निर्मिती : फायजर सक्रीय
अमेरिकेत कोरोना लसीच्या वितरणासाठी चार्टर्ड फ्लाइट्स सुरू करण्यात आल्या आहेत. युनायटेड एअरलाइन्सच्या विमानाने फायजरची कोरोनावरील लस एका ठिकाणाहून दुसऱया ठिकाणी पाठविली जात आहे. काही दिवसांपूर्वीच फायजरने स्वतःची लस 95 टक्के प्रभावी असल्याचे जाहीर केले होते.
अमेरिकेत लसीकरण केंद्राच्या अत्यंत नजीकपर्यंत विमानानेच लसीचा पुरवठा करण्याची फायजर कंपनीची योजना आहे. परंतु वितरण केंद्रापासून लसीकरण केंद्रापर्यंत कोरोना लस पोहोचविण्यास 3 दिवसांचा कालावधी लागू शकतो.
विमानाने लसीची वाहतूक करणे जागतिक पुरवठा आणि वितरणासाठी एक महत्त्वाची तयारी ठरणार आहे. डिसेंबरच्या अखेरीस अमेरिकेत लसीकरण सुरू होण्याची अपेक्षा आहे. फूड अँड ड्रग ऍडमिनिस्ट्रेशन लवकरच लसीला मंजुरी देऊ शकते.
लसीच्या पुरवठय़ासाठी युनायटेड एअरलाइन्सला विमानात अतिरिक्त बर्फ ठेवण्याची मंजुरी देण्यात आली आहे. फायजरची लस उणे 70 अंश सेल्सिअसमध्ये ठेवावी लागते. लसीच्या पुरवठय़ासाठी फायजरने सुटकेसच्या आकारातील बॉक्सही तयार केले असून त्यात कोरडय़ा बर्फासह लस ठेवण्यात येणार आहे.
अमेरिका आणि युरोपमधील कंपनीच्या गोदामांमध्ये यापूर्वीच लसीचे लाखो डोस उपलब्ध असल्याचे फायजरने स्पष्ट केले आहे. मंजुरी मिळताच वितरण सुरू करता यावे याकरता तयारी केली जात आहे. कंपनी एका दिवसात 20 विमानांमधून लसीची वाहतूक करू शकते.
प्रवासाने अडचण वाढणार
नाताळ नजीक असून संक्रमण नियंत्रणात येण्याची चिन्हे नाहीत. अमेरिकेत सणासुदीच्या काळामुळे लोक प्रचंड प्रवास करत आहेत. या वाढत्या प्रवासामुळे चाचण्यांच्या प्रक्रियेला फटका बसत आहे. थँक्सगीव्हिंज हॉलिड्जेमध्ये चाचण्या कमी झाल्या आहेत. याचमुळे बाधितांचा शोध तुलनेने कमी प्रमाणात लागत आहे.
जर्मनी : 10 लाख रुग
युरोपच्या अन्य देशांप्रमाणे जर्मनीतही संक्रमणाची दुसरी लाट धोकादायक ठरू लागली आहे. दिवसभरात तेथील बाधितांचा आकडा 10 लाखांहून अधिक झाला आहे. काही दिवसांपूर्वी जर्मनीने बऱयाचअंशी संक्रमणावर नियंत्रण मिळविले होते, परंतु आता तेथे रुग्ण वाढू लागले आहेत. दिवसभरात तेथे 22 हजार नवे रुग्ण सापडले आहेत.
अर्जेंटीना : संकट तीव्र
अर्जेंटीनामध्ये कोरोनामुळे मृत्युमुखी पडणाऱयांच्या संख्येत वाढ झाली आहे. मागील 24 तासांमध्ये देशात 275 बाधित दगावले आहेत. तर 7,846 नवे रुग्ण सापडले आहेत. अर्जेंटीना कोरोनाच्या दुसऱया लाटेला सामोरा जात असल्याची घोषणा अध्यक्ष फर्नांडिज यांनी केली आहे.