ऑनलाईन टीम / न्यूयॉर्क :
अमेरिकेसारखा बलाढय देशही कोरोनापुढे हतबल झाला आहे. अमेरिकेला लवकरात लवकर कोरोनावर नियंत्रण मिळवता आले नाही तर 1 लाखाहून अधिक नागरिकांचा मृत्यू होऊ शकतो, असा भीतीदायक अंंदाज अमेरिकेच्या नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ ॲलर्जी अँड इन्फेक्शन डिसिसचे संचालक डॉ. ॲन्थनी फौसी यांनी व्यक्त केला आहे.
अमेरिकेत कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. अमेरिकेत आतापर्यंत 1 लाख 42 हजार 735 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर 2488 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आर्थिक महासत्ता म्हणून जगावर दबदबा असलेली अमेरिका आता कोरोना विषाणूमुळे हादरली आहे.
अमेरिकेत कोरोनाला रोखण्यासाठी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या सरकारचे सर्व पातळ्यांवर प्रयत्न सुरू आहेत. तरीही अमेरिकेत कोरोनावर नियंत्रण मिळवता आले नाही. ट्रम्पही या भीषण संकटापुढे हतबल झालेले दिसत आहेत.