फायजर लसीला मिळू शकते मंजुरी
वृत्तसंस्था / वॉशिंग्टन
कोरोना संक्रमण आता मुलांनाही होऊ लागले आहे. अशा स्थितीत मुलांना कोरोनापासून वाचविण्यासाठी लवकरच पहिली लस उपलब्ध होऊ शकते. अमेरिकेतील एफडीएकडून 12-15 या वयोगटातील फायजरच्या लसीला मंजुरी मिळू शकते. एफडीएफकडून या लसीला मंजुरी मुलांच्या सुरक्षेसाठी उत्सुक मातापित्यांसाठी एक स्वागतार्ह वृत्त ठरणार आहे.
युरोपियन महासंघाचा औषध नियामक ईएमएने मुलांसाठी फायजर-बायोएनटेककडून विकसित करण्यात आलेल्या लसीचे अध्ययन सुरू केले आहे. अमेरिकेतही अशाप्रकारचे परीक्षण झाले आहे. यापूर्वी मार्चमध्ये कंपन्यांच्या नेतृत्वात एका परीक्षणाच्या परिणामांमधून लस वयस्करांच्या तुलनेत किशोरवयीनांमध्ये अधिक प्रभावी असल्याचे आढळून आले आहे. मुलांनी लसीच्या मदतीने मोठय़ा प्रमाणात अँटीबॉडीज तयार केल्या असून याचे कुठलेच गंभीर दुष्परिणाम दिसून आलेले नाही. किशोरवयीनांना सुरक्षा पुरविणे लोकसंख्येत प्रतिरक्षणाची पातळी वाढविण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरू शकते.
लवकरच उपलब्ध
युरोपमध्ये 12-15 वयोगटातील मुलांसाठी जूनमध्ये कोरोनाची लस उपलब्ध करणार असल्याचे जर्मनीमधील औषध कंपनी बायोएनटेकने म्हटले आहे. ही लस 12 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या मुलांसाठी पूर्णपणे सुरक्षित आणि प्रौढांप्रमाणेच कोरोना महामारीचा प्रभाव रोखण्यास उपयुक्त असल्याचा दावा फायजर आणि बायोएनटेकने केला होता.