अमेरिकेत स्थायिक झालेल्या गोवेकरांच्या भावना : वेळीच लॉकडाऊन झाल असत तर नियंत्रण राहिले असते : .24 हजारांहून अधिक लोकांचा बळी
महेश कोनेकर / मडगाव
साऱया जगावर हुकूमत गाजवणाऱया अमेरिकेने कोरोना व्हायरसचे गांभीर्य सुरुवातीपासूनच ओळखले नाही. कोरोना व्हायरसचा विषय सहजरित्या घेतला. त्याची जबर किंमत आज अमेरिकेला मोजावी लागतेय. कालपर्यंत अमेरिकेत कोरोनाबाधितांची संख्या 6 लाखांच्या पलीकडे होती तर एकूण 24 हजारांहून अधिक लोकांचा बळी घेतलाय. कोरोनाचा धोका ओळखला असता तर आज महासत्ता असलेली अमेरिका हादरली नसती, अशी भावना अमेरिकेतील शिकागो शहरात स्थायिक झालेल्या विनिता नाईक यांनी व्यक्त केल्या.
मूळ म्हापसा येथील विनिता नाईक या आपले पती व दोन मुलांसह अमेरिकेतील शिकागो शहरात स्थायिक झालेले आहेत. अमेरिका संपूर्ण जगात महासत्ता म्हणून ओळखली जातेय. पण, ‘कोविड-19’ ने ही महासत्ता पूर्णपणे हादरलीय. आज अमेरिकेत लॉकडाऊन पाळला जातोय, हाच लॉकडाऊन जर सुरुवातीलाच पाळला गेला असता तर आज परिस्थिती अमेरिकेच्या नियंत्रणात राहिली असती. सध्या परिस्थिती प्रचंड बिघडली असून पाच लाखाहून अधिक लोक कोरोना व्हायरसने बाधित झालेले आहे. मृत्यूची संख्या ही 20 हजारांच्या पुढे गेलीय.
प्रत्येक जण एकमेकांकडे संशयाने बघतोय
अमेरिकेतील सर्व रस्ते नेहमीच वाहने व लोकांच्या गर्दीने गजबजलेले असायचे. पण, आज लॉकडाऊनमुळे रस्ते सुने सुने झाले आहेत. अवघीच वाहने रस्त्यावर आढळून येतात. पण, लोक रस्त्यावर येत नाही. वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर, नर्सेस व इतर कर्मचारी तसेच पोलीस यंत्रणा व प्रशासकीय अधिकारी तेव्हढेच कार्यरत आहेत. लोकांना जीवनावश्यक वस्तूचा पुरवठा होत आहे. परंतु बरेऱयाच वस्तुची कमतरता भासू लागल्याची माहिती विनीता नाईक यांनी दिली.
आज कुणी घरातून बाहेर पडला तर कोरोनाग्रस्त रुग्ण असेल म्हणून एकमेकांकडे संशयाने बघतात. पूर्वी असा अनुभव अधिक आला नव्हता. लहान मुले खेळण्यासाठी बाहेर पडत नाही. आपल्या घरातच त्यांना खेळावे लागते. लॉकडाऊनमुळे अनेक बंधने आलीय, त्याचे पालन करण्याचा प्रयत्न या ठिकाणी होतोय. बरेच लोक आपल्या घरातून काम करतात.
विनीता नाईक यांचे पती हे ‘लॅब’मध्ये सायन्टीस्ट आहेत. त्यांना दोन दिवसा आड लॅबमध्ये जावे लागते. लॅबमध्ये प्रवेश करताना व डय़ुटीवरून बाहेर पडताना त्यांचे तापमान तपासले जाते. तसेच सेनिटायझरचा वापर केला जातो. जीवनावश्यक वस्तू खरेदी करताना सुद्धा वेळेचे बंधन घालण्यात आलेले आहे.
14 जानेवारीला कोरोना व्हायरसची माहिती मिळाली
कोरोना व्हायरसची सर्व प्रथम माहिती ही 14 जानेवारीला मिळाली. पण, त्यावेळी कोरोना व्हायरसकडे कुणीच गांभीर्याने पाहिले नाही. अवघ्या चार महिन्यात अमेरिकेत आहाकार माजला असून या ठिकाणी वरिष्ठ पातळीवर एकमेकांवर दोषारोप केले जातात. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनाल्ड ट्रम्प यांनी दूरचित्रवाणीवर बोलताना, देशात 14 जानेवारी नंतर त्वरित लॉकडाऊन सुरू केला होता अशी माहिती दिलीय. या पूर्वीच लॉकडाऊन का पाळला नाही असा मुद्दा सध्या अमेरिकेत चर्चेत आहे व त्यावरून ‘ब्लेमगेम’ सुरू झालीय.
अमेरिकेत आत्ता स्प्रिंग ब्रेक सुरू झाला असता, त्यापूर्वीच लॉकडाऊन सुरू झालाय ही नक्कीच चांगली गोष्ट आहे. कारण स्पिंग ब्रेकच्या काळात अमेरिकेतील नागरिक युरोप, साऊथ अमेरिका, मॅक्सिको इत्यादी ठिकाणी भेट देत असतात. हा ब्रेक सात-आठ दिवसांचा असतो. जर स्प्रिंग बेकच्या नंतर लॉकडाऊन पाळला असता तर अमेरिकेतील नागरिक इतर ठिकाणी फिरायला गेले असते व कोविड-19चा धोका अधिक वाढला असता, असे विनिता नाईक म्हणाल्या.
शिकागो शहरात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 20 हजारांच्या घरात पोचली आहे. त्यामुळे भीतीचे वातावरण आहे. लोक एकमेकांना हॅलो-हाय सुद्धा करत नाहीत. दिवसेंनदिवस रुग्णांची संख्या वाढत आहे. आज स्वतःची जास्तीत जास्त काळजी घेणे हाच एकमेव उपाय आमच्या समोर असल्याचे त्यांनी सांगितले.