सिनसिनाटी
जगभरामध्ये कोरोनाच्या ओमिक्रॉन या व्हेरियंटने धुमाकूळ घातला असून अमेरिकेनेही या विषाणूची धास्ती घेतली आहे. वाढत्या रुग्णसंख्येची दखल घेऊन अमेरिकेने 1 हजारहून अधिक विमान उड्डाणे रद्द केली असल्याची माहिती आहे. या आधीही अमेरिकेने कोरोना रुग्णसंख्या वाढीमुळे कित्येक विमाने रद्द केली होती. विमान उड्डाणे रद्द केल्यामुळे यात्रेकरूंना मोठय़ा प्रमाणात समस्येचा सामना करावा लागला. एवढेच नाही तर थंडीमुळे नववर्ष साजरा करणाऱयांच्या उत्साहावरही विरजण पडल्याचे दिसले. ख्रिसमस सुटीवर जाणाऱयांच्या मनोकामनाही यावेळी अपूर्ण राहिल्या. कोरोना रुग्णांची संख्या वाढल्यामुळे विमानसेवा कंपन्यांमध्ये कर्मचाऱयांचा अभाव जाणवतो आहे. याचीच दखल घेऊन अमेरिकेने विविध मार्गांवरील विमान उड्डाणे रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे या व्यवसायातील व्यावसायिकांना मोठा फटका बसणार आहे. युनायटेड व ऍलिगेंट ट्रव्हल कंपन्यांना कर्मचारी कपातीचा सामना करावा लागला आहे.