ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन :
अमेरिकेने देशातील नागरिकांना विदेश प्रवास करण्यासाठी घातलेले निर्बंध मागे घेतले आहेत. मात्र, भारत, चीनसह 50 देशात प्रवास करण्यासाठी हे निर्बंध कायम असतील.
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे अमेरिकेने 19 मार्चला आपल्या देशातील नागरीकांसाठी विदेश प्रवासाला बंदी घालणाऱ्या क्रमांक चार पातळीवरील निर्बंध लागू केले होते. ते आता हे निर्बंध मागे घेण्यात आले आहेत. जगातील अन्य देशांनी कोरोनाच्या संबंधातील सुरक्षेच्या अनेक उपाययोजना केल्या आहेत. त्यामुळे अमेरिकन नागरीकांना मुक्त प्रवास करता येईल, असे अमेरिकेचे कौन्सिलर अफेअर्स विभागाचे सहायक सेक्रेटरी कार्ल रिश्च यांनी म्हटले आहे.
कोरोना रुग्णवाढीच्या संख्येत भारताचा तिसरा क्रमांक लागतो. त्यामुळे भारतात जाणाऱ्या अमेरिकन नागरीकांना सीमा बंदी, विमानतळ बंदी, असे निर्बंध लागू केले जाऊ शकतात. कोरोनाबरोबरच भारतात गुन्हे आणि दहशतवादही वाढला आहे. त्यामुळे भारतात जाणे सुरक्षित नाही, असे अमेरिकेच्या विदेश मंत्रालयाने म्हटले आहे.