वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
अमेरिकत जाण्याची योजना आखणाऱया लोकांसाठी दिलासा देणारे वृत्त समोर आले आहे. 8 नोव्हेंबरपासून पूर्णपणे लसीकरण झालेल्या सर्व विदेशी नागरिकांना अमेरिकेत येण्याची मंजुरी मिळणार असल्याचे व्हाइट हाउसकडून सांगण्यात आले आहे. पण या लसी मान्यताप्राप्त असणे गरजेचे आहे.
अमेरिकेचा हा निर्णय लाखो लोकांना दिलासा देणारा आहे. जानेवारी 2020 ध्ये चीनमधून येणाऱया प्रवाशांसोबत निर्बंधांना प्रारंभ झाला होता. म्हणजेच सुमारे 21 महिन्यांपर्यंत हे निर्बंध कायम राहिले. त्या कालावधीत डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे अध्यक्ष होते आणि चीनसोबतच त्यांनी अनेक देशांच्या प्रवेशावर बंदी घातली होती.
8 नोव्हेंबरपासून विदेशी नागरिकांना अमेरिकेत येण्याची मंजुरी मिळाली असली तरीही काही प्रश्न अद्याप अनुत्तरित आहेत. 18 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांचे लसीकरण अद्याप पूर्ण न झाल्याने त्यांच्याबाबत कुठलीच भूमिका घेतली जाणार हे स्पष्ट करण्यात आलेले नाही. 8 नोव्हेंबरपर्यंत जगभरातील एअरलाइन्स नव्या नियमांनुसार स्वतःची तयारी पूर्ण करती. 33 देशांना याचा लाभ होणार असून यात भारत, ब्रिटन, चीन आणि युरोपमधील अनेक देश सामील आहेत.
विमानात बसण्यापूर्वी प्रवाशाला लसीकरण प्रमाणपत्र दाखवावे लागणार आहे. याचबरोबर त्यांच्याकडे 48 तासांपूर्वीचा कोरोना आरटीपीसीआर निगेटिव्ह अहवाल असणे आवश्यक आहे.