वृत्तसंस्था /वॉशिंग्टन :
अमेरिकेच्या लुइसियाना आणि टेक्सासमध्ये शक्तिशाली चक्रीवादळ दाखल झाले आहे. लॉरा नावाच्या या चक्रीवादळाच्या प्रभावामुळे तेथे 240 किलोमीटर प्रतितासाच्या वेगाने वारे वाहत आहेत. नॅशनल हरिकेन सेंटरने प्रांतांच्या अनेक हिस्स्यांमध्ये अतिवृष्टी अणि पूराचा इशारा दिला आहे. हे चौथ्या वर्गवारीतील चक्रीवादळ असल्याने प्रचंड नुकसान घडवून आणू शकते.
स्थानिक प्रशासनाचा प्रत्येक सल्ला माना, असे आवाहन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लुइसियाना आणि टेक्सासच्या लोकांना केले आहे. लुइसियानामध्ये हे 1856 (164 वर्षांनी) दाखल झालेले हे सर्वात शक्तिशाली चक्रीवादळ आहे.
5 लाख लोकांचे स्थलांतर
लुइसियाना आणि टेक्सासचे सुमारे 5 लाख लोक स्वतःचे घर सोडून सुरक्षित ठिकाणी गेले आहेत. लुइसियाना येथील कॅमेरॉनच्या किनाऱयावर लॉरा चक्रीवादळ धडकले आहे. चक्रीवादळ दाखल होण्यापूर्वीच तेथे वादळी वारे वाहण्यास सुरुवात झाली होती.
वीजसेवा कोलमडली
लुइसियानाच्या सुमारे 2 लाख घरांमध्ये दोन दिवसांपासून वीजसेवा ठप्प आहे. टेक्सासच्याही 45 हजार घरांमध्ये वीज पुरवठा सध्या बंद करण्यात आला आहे. तत्पूर्वी लॉरा चक्रीवादळाने कॅरेबियन क्षेत्राला धडक दिली होती. तेथे 24 जणांचा मृत्यू झाला आहे. मागील 24 तासांत लॉरा चक्रीवादळ अधिकच धोकादायक ठरले आहे.
कॅटरिनानंतर सर्वात धोकादायक
एका अहवालानुसार 2005 मध्ये न्यू ऑर्लिन्समध्ये आलेल्या कॅटरिना चक्रीवादळानंतर लॉरा सर्वात शक्तिशाली चक्रीवादळ ठरले आहे. कॅटरिनामुळे 1800 जणांचा मृत्यू झाला होता. कॅटरिना हे 5 व्या वर्गवारीतील चक्रीवादळ होते. चक्रीवादळासह महामारीचाही धोका आहे, यामुळे लोकांनी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे, असे आवाहन टेक्सासचे गव्हर्नर ग्रेग अबॉट केले आहे.