चालू महिन्यात पुन्हा सुरू होणार पुतीन-बायडेन यांची चर्चा
वृत्तसंस्था / वॉशिंग्टन
युक्रेन संकट संपुष्टात आणण्याचे संकेत देत रशियाने कुठल्याही क्षणी अमेरिकेसोबत क्षेत्राची सुरक्षा हमी सुनिश्चित करणारी चर्चा सुरू करण्याचा प्रस्ताव मांडला आहे. राष्ट्रपती कार्यालय क्रेमलिनने प्रलंबित मुद्दय़ांवर चर्चेसाठी चालू महिन्यातच राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन यांची अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांच्यासोबत चर्चा होण्याची शक्यता वर्तविली आहे. 7 डिसेंबर रोजी राष्ट्रप्रमुखांदरम्यान व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून चर्चा झाली आहे.
सुरक्षा हमीवर चर्चेसाठी उपविदेशमंत्री सर्गेई रियाबकोव्ह हे कुठल्याही तटस्थ देशात जाण्यासाठी तयार आहेत. तेथे क्षेत्रात जैसे थे स्थिती कायम ठेवत सुरक्षा हमीसाठी करारावर चर्चा होऊ शकते असे क्रेमलिनचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह यांनी सांगितले आहे.
रशिया युक्रेनवर हल्ला करणार नाही. पण युक्रेन नाटोमध्ये सामील झाल्यास रशियाला धोका निर्माण होणार आहे. त्यानंतर नाटोची क्षेपणास्त्र रशियाचा शेजारी देश युक्रेनमध्ये तैनात होणार आहेत. यामुळे रशियाच्या सुरक्षेसमोर आव्हान निर्माण होणार असल्याचे क्रेमलिनने पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे.
शंकांमुळे सैन्य तैनात
युक्रेनच्या सीमेवर रशियाचे एक लाखाहून अधिक सैनिकांना तैनात करण्याचे हेच कारण मानले जात आहे. सुरक्षा हमी संबंधी कराराचा मसुदा मॉस्कोमध्ये बुधवारी अमेरिकेचे सहाय्यक विदेशमंत्री केरेन डानफ्रीड यांना सोपविण्यात आला आहे. मसुद्यातील मुद्दे उघड करण्यास रशियाच्या प्रवक्त्याने नकार दिला आहे.
कठोर आर्थिक निर्बंधांचा इशारा
अमेरिकेने जी-7 च्या व्यासपीठावरून रशियाला कठोर आर्थिक निर्बंधांचा इशारा दिला होता. या निर्बंधांना ब्रिटननेही पाठिंबा दर्शविला होता. तर अन्य देश फ्रान्स, जर्मनी, जपान, इटली आणि कॅनडानेही यावर स्वतःची सहमती दर्शविली आहे. युक्रेनवर रशियाने हल्ला केल्यास त्याच्याविरोधात कठोर निर्बंध लादण्याची तयारी आहे. सर्व देश मिळून आर्थिक निर्बंध लादण्याची ही कारवाई करणार आहेत.